लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) एप्रिलमध्ये महागाई दर आठ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्याने चालू आर्थिक वर्षात रेपो दरात एका टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जे महाग असून, ईएमआय वाढणार आहे.
रेटिंग एजन्सी क्रिसिलने व्याजदरवाढीची शक्यता वर्तवली आहे. क्रिसिलने सांगितले की, चालू आर्थिक वर्षात सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मध्यवर्ती बँकेच्या सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीपेक्षा अधिक वाढला आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक शक्य त्या सर्व उपायोजना करणार आहे.
गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी अचानक पत्रकार परिषद घेतली. 2 मे आणि 4 मे रोजी झालेल्या आरबीआयच्या बैठकीत यावर चर्चा झाली आणि त्यात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बऱ्याच काळापासून रेपो दरात वाढ करण्यात आली नव्हती. यापूर्वी रेपो दर ४ टक्के होता, तो आता ४.४० टक्के होईल, असे दास म्हणाले. ही दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने अर्थव्यवस्थेतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत एमपीसीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दरात ०.४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. अनियंत्रित महागाईमुळे एमपीसीने हा निर्णय घेतला.