RBI Monetary Policy Meeting: सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महागाईसोबत सुरू असलेल्या लढाईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची मंगळवारपासून बैठक सुरू झाली होती. या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल, ईएमआय तेवढाच राहिल का त्यामध्ये कोणते बदल होतील याकडे सर्वांचं लक्ष लागू होतं. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल न केल्याची माहिती दिली. त्यामुळे सामान्यांना तुर्तास दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी मे महिन्यापासून व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली होती. परंतु फेब्रुवारीपासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर आहे. यानंतर एप्रिल आणि जून महिन्यात झालेल्या बैठकीत बेंचमार्क दरांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नव्हते. "भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. याशिवाय महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. कंपन्यांची बॅलन्स शीटदेखील अतिशय मजबूत आहे," अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. भारत योग्य मार्गावर पुढे जात आहे आणि येत्या काळात जगाचे ग्रोथ इंजिन बनेल असंही त्यांनी नमूद केलं.
काय म्हटलेलं तज्ज्ञांनी?
रिझर्व्ह बँक महागाई पाहता सलग तिसऱ्यांदा व्याज दर स्थिर ठेवू शकतं अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. पंजाब अँड सिंध बँकेचे व्यवस्थापकीय संचालक स्वरुप कुमार साहा म्हणाले की रिझर्व्ह बँक जागतिक बाबींसह अनेक गोष्टींवर लक्ष ठेवून असते. त्यामुळे नुकत्याच फेडरल रिझर्व्हनं केलेल्या व्याजदर वाढीलाही रिझर्व्ह बँक ध्यानात घेईल. सध्या माझ्या अंदाजानुसार रिझर्व्ह बँक रेपो दर कायम ठेवू शकते. जर जागतिक परिस्थिती स्थिर राहिली तर व्याजदर येत्या दोन ते तीन तिमाहिंमध्ये कायम राहू शकतात, असंही साहा म्हणाले होते.
दरम्यान, आर्थिक वर्ष २०२४ जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलाय. तर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज ६.६ टक्के वर्तवण्यात आलाय. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सीपीआय ५.१ टक्क्यांवरून वाढून ५.४ टक्के होईल असा अंदाज वर्तवण्यात आला. दरम्यान, सरप्लस लिक्विडिटीमध्ये वाढ झाली असून २००० रुपयांच्या नोटा आल्यानं लिक्विडिटी वाढल्याचे दास यावेळी म्हणाले.
किरकोळ महागाईदराचा अंदाज
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये किरकोळ महागाई दर ५.१ टक्क्यांवरून वाढून ५.४ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला.
Q1FY24 - ५.४ टक्के
Q2FY24- ६.२ टक्के
Q3FY24 - ५.७ टक्के
Q4FY24- ५.२ टक्के
रेपो रेट म्हणजे काय?
बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, तोच रेपो रेट. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. परंतु, हे दर वाढले तर बँकांचं कर्जही महाग होतं आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
बँकांकडे शिल्लक राहिलेली रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. हा रिव्हर्स रेपो रेट बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःच्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.