RBI MPC Meeting : गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं सातत्यानं रेपो दरात वाढ केली आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं होतं. सध्या महागडे कर्ज आणि वाढत्या ईएमआयमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. रिझव्र्ह बँकेने रेपो रेट कमी करावा, जेणेकरून कर्जावरील व्याजदर थोडे खाली येतील अशी कर्जदारांची अपेक्षा आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण धोरण समितीची (RBI MPC Meeting) तीन दिवसीय बैठक ६ जूनपासून सुरू होत आहे. ही बैठक ८ जूनपर्यंत चालणार आहे. दरम्यान, ८ जून रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यासंदर्भातील माहिती देतील. या बैठकीत रिझर्व्ह बँक रेपो दराबाबत कोणता निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु यावेळी रेपो दर स्थिर राहू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. महागाई दर कमी झाल्यानं रिझर्व्ह बँक हा निर्णय घेऊ शकते.
रेपो दर जैसे थे...
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे भारतातील महागाईचा दरही वाढला. जेव्हा महागाई वाढली तेव्हा रिझर्व्ह बँकेनं मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान रेपो रेट २.५ टक्क्यांनी वाढवला. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवले होते. यानंतर एप्रिलच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नाही.
महागाई दर ४.७ टक्क्यांवर
ताज्या आकडेवारीनुसार, कन्झुमर प्राईझ इंडेक्सवर आधारित महागाई (किरकोळ महागाई) एप्रिलमध्ये ८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. ही ४.७ टक्क्यांवर आली असून ती रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेदरम्यान आहे. किरकोळ महागाईचं रिझर्व्ह बँकेचं लक्ष्य ४ टक्के आहे.