Join us

महागाईपासून सर्वसामान्यांना कधी मिळणार दिलासा?; RBI गर्व्हनरनं दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:43 PM

RBI MPC Meeting : चलनविषयक समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अंदाजे किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंतर (RBI MPC Meeting) गुरुवारी सांगितले की, चालू तिमाही जानेवारी-मार्च 2022 मध्ये किरकोळ महागाईचा (Retail Inflation) ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरच यामध्ये दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. 

चलनविषयक समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अंदाजे किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले की, पुढील आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. चलनवाढीचा दर चालू तिमाहीत उच्च राहील, पण तो 6 टक्क्यांच्या निश्चित मर्यादेच्या पुढे जाणार नाही. दरम्यान, वृत्तसंस्था रॉयटर्सने अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, जानेवारीमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6 टक्क्यांवर पोहोचेल, जो आरबीआयच्या व्याप्तीचा अंतिम आहे.

शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे की, सध्या किरकोळ महागाईपासून फारसा दिलासा दिसून येत नाही आणि 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच सप्टेंबर 2022 नंतरच महागाई नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. देशांतर्गत घटकांपेक्षा महागाई जागतिक घटकांच्या दबावाखाली आहे. जगभर महागाई वाढत आहे. अशा स्थितीत सध्याच्या काळात महागाई केवळ भारतात कमी होण्याची शक्यता नाही.

लोकांच्या मनात महागाईचा विचार - दासयाचबरोबर, महागाईबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अन्न, भाजीपाला, इंधन, कपडे महाग आहेत असे जर लोकांना वाटत असेल तर त्यांच्या मनात महागाईचा विचार येईल, असे ते म्हणाले. मात्र, ग्राहक उत्पादनांशी (Consumer Products) संबंधीत कंपन्या आणि दूरसंचार कंपन्यांच्यावतीने (Telecom Companies) वाढलेल्या किमतीचा परिणाम किरकोळ महागाईवरही नक्कीच दिसून येईल.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहागाईशक्तिकांत दास