नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank Of India) तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीची (Monetary Policy Committee) बैठक उद्या म्हणजे बुधवारपासून सुरू होणार आहे, जी 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यानंतर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करतील.
दरम्यान, आरबीआयची चलनविषयक धोरण समिती रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच अर्धा टक्का वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. रेपो रेट 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्के केला जाऊ शकतो. असे झाल्यास तर तुम्हाला महागाईचा फटका बसू शकतो, कारण तुमचा ईएमआय (EMI) महाग होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईचा ( Retail Inflation) दर 7 टक्के होता. त्यामुळे हा आरबीआयचा टॉलरन्स लेव्हल सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत, आरबीआय पॉलिसी बैठकीत सलग चौथ्यांदा रेपो रेट वाढवू शकते.
जेपी मॉर्गन ते मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley) यांना विश्वास आहे की, आरबीआय रेपो दर 0.50 टक्क्यांनी वाढवू शकते. मॉर्गन स्टॅनलीने आपल्या रिपोर्ट म्हटले आहे की, यापूर्वी आम्ही अंदाज लावला होता की, रेपो रेट 35 बेसिस पॉईंटने वाढू शकतो. पण महागाई वाढल्यानंतर आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या (Central Banks) वृत्तीनंतर रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ होऊ शकते असा आमचा अंदाज आहे.
काय होणार परिणाम?
आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बँकांना कर्ज घेणे महाग होईल, ज्याचा बोजा बँका आपल्या ग्राहकांवर टाकतील. रेपो रेट वाढल्यावर गृहकर्जापासून ते कार कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज महाग होईल. ज्या लोकांचे आधीपासून रेपो रेट आधारित गृहकर्ज चालू आहे, त्यांचा ईएमआय महाग होईल.
रेपो रेटमध्ये तीन पटीने वाढ!
2022 मध्ये आरबीआयने रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. मे महिन्यात पहिल्यांदा आरबीआयने 40 बेसिस पॉइंट्सने, दुसऱ्यांदा जूनमध्ये 50 बेस पॉईंट्सने आणि नंतर ऑगस्टमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली. अलीकडे, अमेरिका आणि ब्रिटनमधील सेंट्रल बँकेने कर्जे महाग केली आहेत. त्यानंतर आरबीआय व्याजदरही वाढवू शकते. मात्र, या वाढीसह व्याजदर वाढवण्याची प्रक्रियाही येथेच थांबण्याची शक्यता असल्याने आगामी काळात वस्तूंच्या किमती कमी झाल्याने महागाई कमी होण्याची शक्यता आहे.