Join us

RBI News : प्रतिकूल हवामानामुळे महागाई वाढण्याचा धोका; जीडीपी वाढीतही अडथळा ठरू शकतं, काय म्हटलंय आरबीआयनं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:18 AM

RBI News : प्रतिकूल हवामानामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. तसंच, जागतिक स्तरावर दीर्घकाळ तणावपूर्ण परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर राहू शकतात, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.

RBI News : प्रतिकूल हवामानामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. तसंच, जागतिक स्तरावर दीर्घकाळ तणावपूर्ण परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर राहू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एप्रिलच्या बुलेटिनमध्ये यासंदर्भात सांगण्यात आलंय. मार्चमध्ये कन्झ्युमर प्राईज इंडेक्सवर आधारित किरकोळ महागाई ४.९ टक्क्यांवर आली. 

यापूर्वी गेल्या दोन महिन्यांत ती सरासरी ५.१ टक्के होती. रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरणाच्या निर्णयावर येण्यापूर्वी प्रामुख्याने किरकोळ महागाई लक्षात घेते. रिझर्व्ह बँकेनं महागाईच्या आघाडीवरील चिंतेचा हवाला देत फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. 

जीडीपीवर परिणाम होऊ शकतो 

देशात वास्तविक जीडीपी वाढीचा दर वेगवान होण्यासाठी परिस्थिती निर्माण होत आहे, परंतु दीर्घकाळापर्यंत जागतिक तणाव आणि प्रतिकूल हवामानाच्या घटनांमुळे महागाईचा धोका निर्माण होऊ शकतो, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. रिझर्व्ह बँकेच्या बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या 'स्टेट ऑफ द इकॉनॉमी' या शीर्षकाच्या लेखात २०२४ चा वसंत ऋतु उष्ण असेल असं म्हटलंय. मार्च २०२४ हा गेल्या १७० वर्षांतील सर्वात उष्ण मार्च महिना असेल, याकडे हे संकेत आहेत. डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रता पात्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमनं, या उन्हाळ्यात सावधगिरी बाळगावी लागणार असल्याचं म्हटलंय. 

मान्सूनपूर्वी महागाई वाढणार 

मान्सूनच्या आगमनापूर्वी अधिक गरमीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. "नजीकच्या काळात, दीर्घकाळ सुरू असलेले भू-राजकीय तणाव आणि प्रतिकूल हवामानाच्या घटनांमुळे महागाईचा धोका निर्माण होऊ शकतो," असंही या लेखात नमूद करण्यात आलंय.