Join us

दोन हजाराच्या नोटेबद्दल RBIची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 7:52 PM

आरटीआय अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाला आरबीआयकडून उत्तर

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून दोन हजार रुपयांच्या उलटसुलट चर्चा सुरू होत्या. बँकांनी एटीएममधील दोन हजार रुपयांचे स्लॉट्स कमी केल्याची अफवा पसरल्यानं ग्राहक चिंतेत होते. अखेर आरबीआयनं याबद्दल स्पष्टीकरण देत सर्व अफवांचं खंडन केलं. यानंतर आता आरटीआय अंतर्गत करण्यात आलेल्या एका अर्जाला उत्तर देताना आरबीआयनं दोन हजार रुपयांच्या नोटेबद्दल मोठी माहिती दिली आहे. काही दिवसांपासून दोन हजार रुपयांच्या नोटांचं चलनातलं प्रमाण कमी झाल्यानं या नोटा बंद होणार की काय अशी शंका अनेकांच्या मनात आली. याच पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या एका आरटीआयला आरबीआयनं उत्तर दिलं आहे. आरबीआयकडून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याची माहिती यात आहे. चालू आर्थिक वर्षात आरबीआयनं दोन हजाराची एकही नोट छापलेली नाही. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निश्चलनीकरणाचा (नोटबंदीचा) निर्णय जाहीर केला. त्यामुळे जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्या. यानंतर आरबीआयनं दोन हजारांच्या नोटेसह 500 रुपयांची नवी नोट चलनात आणली. 2016-17 या आर्थिक वर्षात आरबीआयनं 2 हजार रुपयांच्या 3,542.991 मिलियन नोटा छापल्या. 2017-18 मध्ये हाच आकडा 111.507 मिलियनवर आला. 2018-19 मध्ये हा आकडा आणखी कमी झाला. या कालावधीत आरबीआयनं दोन हजाराच्या केवळ 46.690 मिलियन नोटा छापल्या.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक