Join us

Raghuram Rajan : “व्याजदर वाढवणं देशविरोधी कृत्य नाही, आपल्या भूतकाळातून शिका,” रघुराम राजन यांचा RBI ला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 3:36 PM

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणात्मक दर वाढवणे हे 'देशविरोधी कृत्य' नसून देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी केलेली गुंतवणूक असल्याचं मत राजन यांनी व्यक्त केलं.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून स्थिर ठेवण्यात येत असलेले व्याजदर वाढवण्याची मागणी होत आहे. आर्थिक स्थैर्यासाठी द्रिझर्व्ह बँकेला (RBI) हे दर वाढवावे लागतील, असं म्हटलं जात आहे. अशा स्थितीत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनीही यावर भाष्य केलं आहे. रिझर्व्ह बँकेला कधी ना कधी हे दर वाढवावे लागतील असं म्हणत त्यांनी भूतकाळातून शिकण्याचा सल्लाही रिझर्व्ह बँकेला दिला.

“महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणात्मक दर वाढवणे हे 'देशविरोधी कृत्य' नसून देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. महागाईविरुद्धचा लढा कधीही न संपणारा आहे आणि यापूर्वी काय घडलं ते रिझर्व्ह बँकेने लक्षात ठेवल्यास खूप मदत होईल,” असंही राजन यांनी स्पष्ट केलं. त्यांनी यासंदर्भात LinkedIn वर एक पोस्ट शेअर केली आहे.

व्याजदरात बदल करणं कोणत्याही परदेशी गुंतवणूकदाराला फायदा पोहोचवण्यासाठी कोणतीही देशविरोधी कृती नाही, परंतु आर्थिक स्थिरतेसाठी करण्यात आलेली गुंतवणूक आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतीय नागरिकांना होईल. दर वाढवणं लोकांना आवडत नाही, परंतु रिझर्व्ह बँकेनं ते करावं, जे त्यांना करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळाचीही आठवण करून दिली. “त्यावेळी भारताला चलन संकटाने घेरले होते आणि महागाईचा दर ९.५ टक्क्यांवर पोहोचला होता. तेव्हा RBI ने महागाई नियंत्रित करण्यासाठी सप्टेंबर २०१३ मध्ये रेपो रेट ७.२५ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर नेला होता आणि जेव्हा महागाई कमी झाली तेव्हा रेपो दर १५० बेसिस पॉईंटने कमी करून ६.५ टक्क्यांनी कमी केला होता,” असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

आपल्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्था स्थिर झाली होती आणि जून-ऑगस्ट २०१३ मध्ये विकास दर ५.९१ टक्क्यांवरून जून-ऑगस्ट २०१६ मध्ये ९.३१ टक्क्यांवर गेला. यामुळे परकीय चलन साठ्यातही सुधारणा झाल्याचंही राजन म्हणाले. वृद्धी आणि स्थिरता यात केवळ रिझर्व्ह बँकेचा वाटा होता असं नाही, तर यात अन्य घटकांचाही समावेश असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :रघुराम राजनभारतीय रिझर्व्ह बँकभारत