RBI Gold : देशभरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. बुधवारी धनत्रयोदिशीच्या दिवशी लोकांनी सोने खरेदीचा भरपूर आनंद लुटला. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीतून १०२ टन सोने भारतात परत मागवले आहे. आरबीआय देशाच्या सोन्याचा साठा सातत्याने वाढवत आहे. आरबीआयकडे आता एकूण ८५५ टन सोन्याचा साठा आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे भारतातील सोन्याचा साठा आणखी वाढला आहे. सप्टेंबर २०२२ पासून भारताने २१४ टन सोने परत आणले आहे. परंतु, हे सोने परत मागवण्यामागे काय कारण आहे?
भारताबाहेर ठेवलेले सोने RBI परत का मागवत आहे?सध्या भारताने ४०० टनांहून अधिक सोने विविध देशांमध्ये ठेवले आहे. मात्र, या सोन्याची सुरक्षितता आणि सांभाळण्यावर प्रचंड पैसा खर्च होत आहे. आता देशात हे सोने ठेवण्यासाठी उच्चप्रतिची सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यामुळे आपली मौल्यवान मालमत्ता आपल्याजवळ असावी या सरकारी धोरणानुसार आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते, तेव्हा सरकारला संवेदनशील माहिती आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अशी पावले उचलावी लागतात.
भारताकडे एकूण ८५५ टन सोन्याचा साठाआरबीआयकडे आता देशात एकूण ५१०.५ टन सोन्याचा साठा आहे, तर एकूण ८५५ टन सोन्याचा साठा आहे. देशात सोने ठेवण्याच्या त्याच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून आरबीआय अनेक पावले उचलली आहेत. जागतिक परिस्थिती आणि वाढत्या भू-राजकीय जोखमींमुळे, देशांतर्गत पातळीवर एखाद्या मालमत्तेचे व्यवस्थापन करून भारतात आर्थिक सुरक्षा वाढवणे आवश्यक झाले आहे. सरकारच्या उद्दिष्टानुसार ही पावले उचलली जात आहेत.
सोने परत मागवण्याची तयारी पूर्णया सोन्याच्या वाहतुकीसाठी कडक गुप्तता आणि प्रगत सुरक्षा यंत्रणा वापरण्यात येते. त्यासाठी विशेष विमाने आणि सुरक्षित प्रोटोकॉलचा समावेश करणे बंधनकारक आहे. भारताने आपल्या मातीत मोठ्या प्रमाणात सोने परत आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी मे महिन्यात भारताने बँक ऑफ इंग्लंडकडून १०० टन सोने देशांतर्गत तिजोरीत हस्तांतरित केले. हे १९९० नंतरचे सर्वात मोठे सोन्याचे हस्तांतरण होते.