Join us

रेपो रेट-सीआरआर वाढल्याने एवढा वाढेल तुमचा EMI, आता कर्जदारांसमोर EMI कमी करण्यासाठी हे आहेत हे पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 12:18 PM

RBI Repo Rate Hike: रेपो रेट वाढल्याने होम लोन, कार लोन, पर्सनल लोन या सर्वांवरील ईएमआय वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे तुमचा ईएमआय किती वाढेल आणि त्याचा बोजा कमी करण्यासाठी काय करावे लागेल, त्याचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने अप्रत्यक्ष पद्धतीने रेपो रेट आणि कॅश रिझर्व्ह रेश्योमध्ये वाढ केल्याची घोषणा केली. त्यामुळे आता रेपो रेट ४ टक्क्यांवरून वाढून ४.४० टक्के झाले आहेत. तसेच सीआरआर आता ४ टक्क्यांवरून वाढून ४.५० टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेने महागाई कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. मात्र रेपो रेट वाढल्याने होम लोन, कार लोन, पर्सनल लोन या सर्वांवरील ईएमआय वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे तुमचा ईएमआय किती वाढेल आणि त्याचा बोजा कमी करण्यासाठी काय करावे लागेल, त्याचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

रेपो रेट वाढल्याने कर्जाच्या ईएमआयमध्ये किती वाढ होईल, हे एका उदाहरणातून समजून घेऊया. जर तुम्ही ५० लाख रुपयांचं होम लोन घेतलं असेल आणि कर्जाचा कालावधी २० वर्षांचा असेल, तसेच व्याजदर ६.७ टक्के असेल तर या स्थितीत तुमच्या मासिक ईएमआयमध्ये १२०० रुपयांनी वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं होमलोन हे ७५ लाख रुपयांचं असेल आणि टेन्योर २०वर्षे आणि सध्याचा व्याजदर ६.७ टक्के असेल तर तुमच्यावरील ईएमआय १८०० रुपयांनी वाढेल. तर तुमचं २५ लाख रुपयांच कर्ज असेल आणि त्याचा कालावधी २० वर्षे व व्याजदर ६.७ टक्के असेल तर तुमचा ईएमआय १८०० रुपयांनी वाढेल.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे होम लोन आणि प्रॉपर्टी लोनवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ईएमआय कमी करण्यासाठी काय पर्याय आहेत, याची चाचपणी कर्जदारांकडून केली जात आहे. होम लोनसारख्या दीर्घकालीन कर्जांवरील ईएमआय कमी करण्यासाठी ग्राहकांकडे दोन पर्याय आहेत. त्यामध्ये कर्जदार ग्राहक कर्जाचा कालावधी आणखी वाढवू शकतात किंवा प्री-पेमेंट करू शकतात.

बँकबाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांच्या सल्ल्यानुसार कर्जाचा कालावधी वाढवण्यापेक्षा प्री पेमेंट करणे हा चांगला पर्याय आहे. सर्वसाधारणपणे लोक ईएमआय कमी करण्यासाठी कालावधी वाढवतात. असे केल्यास तुम्हाला त्याच कर्जासाठी अधिक काळापर्यंत हप्ते भरावे लागतात. त्यामध्ये तुम्हाला आधीपेक्षा जास्त व्याज भरावे लागते. मात्र होमलोनसारख्या दीर्घकालीन कर्जावर प्रीपेमेंटची सुविधा दिली जाते. जर तुम्ही दरवर्षी पूर्ण कर्जामधील ५ टक्के रक्कम ही प्री पेमेंट केली, किंवा एका ईएमआय एवढी रक्कम आधीच भरली, तर त्यामुळे केवळ तुमची ईएमआयच कमी होणार नाही तर सोबतच तुमची चांगली बचतही होईल.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रपैसा