नवी दिल्ली – कोरोना संक्रमणाच्या २ वर्षाच्या काळात नोटांवरील रंग फिकट होत असल्याचं दिसून येत आहे. या काळात नोटा खराब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यात २ हजार, ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. आरबीआय(RBI) नं नोटा खराब होण्यामागं कोरोना जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. २०१८-१९ मध्ये २ हजारांच्या केवळ ६ लाख नोटा खराब झाल्या होत्या परंतु २०२०-२१ मध्ये तब्बल ४५.४८ कोटी नोटा खराब झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे.
नोटा खराब होण्याचं प्रमाण मागील वर्षी ७५० टक्क्यांनी वाढलं आहे. तर २०० रुपयाच्या केवळ १ लाख नोटा २०१८-१९ मध्ये रिझर्व्ह बँकेकडे खराब अवस्थेत परत आल्या होत्या. तेच प्रमाण २०२०-२१ मध्ये ११.८६ कोटी इतकं झालं. ते ११८६ पटीनं जास्त आहे. तर ५०० रुपयांच्या नोटा खराब होण्याचं प्रमाण ४० पटीनं वाढलं आहे. तर कमी मूल्य असलेल्या नोटांमध्ये हे प्रमाण अर्ध्या टक्क्यांनी वाढलं आहे.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार खराब बँक नोटा ज्या संपुष्टात आल्या(लाखांची संख्या)
नोट | 2018-19 | 2019-20 | 2020-21 |
2000 | 06 | 1768 | 4548 |
500 | 154 | 1645 | 5909 |
100 | 37945 | 44793 | 42433 |
50 | 8352 | 19070 | 12738 |
20 | 11626 | 21948 | 10325 |
10 | 65239 | 55744 | 21999 |
5 | 591 | 1244 | 564 |
200 | 01 | 318 | 1186 |
सॅनिटायजेशन आणि प्रेस करणं बनलं कारण
कोरोना लॉकडाऊन गेल्यावर्षी मार्च २०२० मध्ये लागलं. परंतु लोकांच्या मनात २०१९ च्या अखेरपासून कोरोनाची दहशत निर्माण झाली होती. त्यात नोटांमधून कोरोना पसरतोय अशी अफवा पसरली. तेव्हा लोकांनी इतर गोष्टीप्रमाणे नोटाही सॅनिटायजेशन करण्यास सुरूवात केली. कोरोनाची भीती इतकी होती की, ज्यांच्याकडे सॅनिटायजर नाही अशांनी साबणाने नोटा धुवून त्यानंतर इस्त्रीने त्या प्रेस केल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोटा खराब आणि रंग फिकट झाले. यामुळेच २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये २ हजारांच्या नोटा अडीच पटीनं, ५००-२०० रुपयांच्या नोटा साडेतीन पटीनं जास्त खराब झाल्या आहेत.
कोरोनाच्या काळात लोकांमध्ये संक्रमणाची भीती असल्याने नोटा सॅनिटायजेशन केल्या. अनेकांनी त्या साबणाने धुतल्या. त्यामुळे नोटा खराब झाल्या. जास्त मूल्य असलेल्या नोटा लोकांनी सॅनिटायझेशन केल्यानंतरही अनेक दिवस जपून ठेवल्या. तेव्हा नोटांचा रंग फिकट होऊ लागला.हेच नोटा खराब होण्याचं मोठं कारण आहे. त्यात छोट्या नोटा रोज एकाकडून दुसऱ्याच्या हातात जात होत्या. त्याला हवा लागल्यामुळे जास्त खराब झाल्या नाहीत असं पंजाब नॅशनल बँक वर्कर्स यूनियचे महामंत्री कमलेश चर्तुवैदी म्हणाले.