मुंबई : टाटा केमिकल्सच्या समभाग खरेदीवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांची संख्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्याने ‘फेमा’ कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.टाटा केमिकल्स लिमिटेड ही टाटा समूहातील मोठी कंपनी असून, प्रामुख्याने मीठनिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचे मुंबई शेअर बाजार (बीएसई) व राष्टÑीय शेअर बाजारात (एनएसई) एकूण २५.४७ कोटी समभाग आहेत, यापैकी ३० टक्के समभाग प्रवर्तकांकडे आहेत. १८.०५ टक्के समभाग सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे आहेत, तर विदेशी गुंतवणूकदारांकडील समभाग ११.०८ टक्क्यांसह २.८२ कोटींवर पोहोचले आहेत. ही संख्या मर्यादेपलीकडे गेल्याने रिझर्व्ह बँकेने कारवाई केली.विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) प्रत्येक कंपनीतील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) समभागांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. काही कंपन्यांसाठी ती १०, काहींसाठी ३० तर काहींसाठी ४० टक्के आहे.याखेरीज काही कंपन्यांना शेअर बाजाराच्या यादीत प्रविष्ट होताना मर्यादा घोषित करावी लागते. त्या श्रेणीत ७५ टक्के विदेशी गुंतवणुकीलाही परवानगी आहे.टाटा केमिकल्ससाठी ही मर्यादा १० टक्के होती. ती ११.०८ टक्क्यांवर गेल्याने आता कंपनीला मर्यादा वाढविण्यासंबंधी पुन्हा विस्तृत परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांच्या समभागांची खरेदी करता येईल, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
टाटा केमिकल्सवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 1:39 AM