Join us

RBI ची मोठी घोषणा, आता बँका जारी करू शकतात RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 2:40 PM

RBI MPC Meeting : आरबीआयने आता बँकांना रुपे प्री-पेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : आजचा दिवस सर्वसामान्यांसाठी खूप खास आहे. आरबीआयचे प्रमुख शक्तिकांत दास यांनी सर्वसामान्यांना दिलासा देताना रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, रुपे कार्डबाबत आरबीआयच्या एमपीसी बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

आरबीआयने आता बँकांना रुपे प्री-पेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे. याचा फायदा करोडो लोकांना होणार आहे. यासोबतच आरबीआयचे हे पाऊल रुपे कार्डला जागतिक बाजारपेठेत वेगाने वाढण्यास मदत करेल. या प्री-पेड रुपे कार्डमुळे लोक परदेशात सहज पेमेंट करू शकतील. यासोबतच परदेशात रुपे डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड वापरण्याची परवानगी असणार आहे.

आरबीआयच्या प्री-पेड फॉरेक्स कार्डचा फायदा करोडो लोकांना होणार आहे. परदेशात राहणाऱ्या लोकांना प्री-पेड फॉरेक्स कार्ड्सचा फायदा होईल. याचा फायदा उद्योजक, परदेशात शिकणारे विद्यार्थी आणि वारंवार परदेशात जाणाऱ्या लोकांना होईल. दरम्यान, फॉरेक्स रुपे कार्ड हे प्रीपेड कार्ड आहे. या अंतर्गत तुम्ही शॉपिंग आणि इतर खर्च करू शकता.

रुपे कार्डला जागतिक ओळख मिळेलआरबीआयच्या या निर्णयामुळे रुपे कार्डला जागतिक ओळख मिळणार आहे. नुकताच आरबीआयचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यानुसार, पेमेंट व्हिजन डॉक्युमेंट 2025 ने यूपीआय आणि रुपे कार्डला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पूर्ण नियोजन आधीच केले होते. दरम्यान, रुपे कार्डला जागतिक स्तरावर नेण्यासाठी भूतान, सिंगापूर, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत को-ब्रँडिंगशिवाय हे कार्ड वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच इतर देशांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक