Join us

RBI चा Paytm ला दणका! पेमेंट्स बँकेला ठोठावला तब्बल १ कोटींचा दंड; सेटलमेंट नियमांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:02 PM

RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला मोठा दंड ठोठावला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अनेक बँका तसेच डिजिटल स्वरुपात व्यवहार करणाऱ्या संस्थांना दणका देत मोठा दंड ठोठावताना पाहायला मिळत आहे. एचडीएफसी (HDFC), स्टेट बँक (SBI) यांसारख्या बड्या बँकांना दंड केल्यानंतर आता आरबीआयने देशातील आघाडीच्या पेमेंट बँकांपैकी एक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयने केलेली कारवाई पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. 

RBI ने देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक SBI ला नियामक सूचनांचे पालन न केल्याने १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यानंतर आता RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड म्हणजेच PPBL ला तब्बल १ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पेमेंट आणि सेटलमेंटच्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक निवेदन जारी केले असून, पेटीएम पेमेंट्स बँकेचे प्रकरण पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करण्याशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. 

अधिकृततेचे अंतिम प्रमाणपत्र जारी करण्यासाबाबत तपासणी

अधिकृततेचे अंतिम प्रमाणपत्र जारी करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अर्जाची तपासणी करताना रिझर्व्ह बँकेला आढळून आले की, पेटीएम पेमेंट्स बँकेने अशी माहिती दिली आहे, जी वास्तविक स्थिती दर्शवत नाही. हे पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायद्याचे उल्लंघन करत असल्याने पेटीएम पेमेंट्स बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. वैयक्तिक सुनावणीदरम्यान प्राप्त लेखी उत्तरे आणि तोंडी इनपुटचे पुनरावलोकन केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पुनरावलोकन केल्यानंतर आरोप खरे असल्याचे आढळले. यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेवर दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

वेस्टर्न युनियनला २७ लाखांचा दंड

पेटीएम पेमेंट्स बँकसह रिझर्व्ह बँकेने वेस्टर्न युनियन फायनान्शिअल सर्व्हिसेसविरोधात दुसऱ्या प्रकरणात मोठी कारवाई केली. मध्यवर्ती बँकेने वेस्टर्न युनियनला २७.८ लाख रुपयांचा दंड ठोठावला. मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, वेस्टर्न युनियनने मनी ट्रान्सफर सर्व्हिस स्कीम (एमटीएसएस) च्या काही नियमांचे उल्लंघन केले. वेस्टर्न युनियनला एका आर्थिक वर्षात ३० पेक्षा जास्त पैसे पाठवण्याची परवानगी दिल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपे-टीएम