मुंबई, दि. 26 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असल्याची माहिती मिळाली. सरकारने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर जवळपास पाच महिन्यांपूर्वीच छपाई बंद करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक सध्या कमी मुल्याच्या नोटांच्या छपाईकडे लक्ष देत आहे. यामध्ये 200 रुपयांच्या नोटेचाही समावेश आहे. म्हैसूरमध्ये 200 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे येणा-या दिवसांमध्ये 2000 रुपयाच्या नोटांचा तुटवडा जाणवू शकतो.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी नोटांबदीची घोषणा केल्यानंतर 1000 रुपये मूल्याच्या जवळपास तब्बल 6.3 अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीची घोषणा करत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. यानंतर सरकारने 2000 रुपयांच्या नव्या नोटांच्या माध्यमातून 7.4 ट्रिलियन मूल्याच्या 3.7 अब्ज नोटा बाजारात आणल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं.
सध्या जे प्रिंटिंग सुरु आहे त्यामध्ये 90 टक्के 500 च्या नोटांचा समावेश आहे. 500 रुपयांच्या जवळपास 14 अब्ज नोटांची छपाई आतापर्यंत पुर्ण झाली आहे. हा आकडा नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या 500 च्या जुन्या नोटांच्या आकड्याच्या आसपास आहे. 500 रुपयांच्या 15.7 अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या.
म्हैसूरमध्ये 200 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु असून पुढील महिन्यात या नोटा बाजारात येतील अशी अपेक्षा आहे. 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली असली तरी 500 च्या नोटांची छपाई सुरु आहे. त्यामुळे 2000 च्या नोटांचा तुडवडा 500 च्या नोटा भरुन काढतील असं सांगण्यात आलं आहे. 20 जुलै रोजी इकॉनॉमिक टाईम्सने देशातील काही शहरांमध्य़े 2000 च्या नोटांचा तुडवडा भासत असल्याचं वृत्त दिलं होतं.
'गेल्या 40 दिवसांपासून आरबीआयने 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा सुरु केला असल्याने दोन महिन्यांपुर्वी जाणवणारा नोटांचा तुडवडा भरुन निघाला आहे', अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप-व्यवस्थापकीय संचालक निरज व्यास यांनी दिली आहे. मात्र यादरम्यान 2000 रुपयांच्या पुरवठ्यात घट झाल्याचंही निदर्शनास आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
होशंगाबादमधील गव्हर्नमेंट प्रेस युनिटमध्ये नुकतीच 200 रुपयांच्या नव्या सॅम्पल नोटेची गुणवत्ता आणि सुरक्षतेसंदर्भातील सर्वबाबीची पडताळणी करण्यात आली. यानंतर कर्नाटकातील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सालबोनी प्रिटिंग प्रेसमध्ये त्या छपाईसाठी पाठवण्यात आल्या. यात म्हैसूरमध्ये छपाई सुरु करण्यात आली आहे.