मुंबई : महागाईचा सर्वात वाईट टप्पा नुकताच मागे गेला आहे; परंतु किंमतवाढीविरुद्ध हलगर्जीपणाला वाव नाही. आरबीआय अर्जुनासारखी महागाईवर नजर ठेवून आहे. किमती स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक लवचीक दृष्टिकोन स्वीकारेल, असे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.
पतधोरण बैठकीनंतर गव्हर्नर म्हणाले की, जगभरात काही देशांमध्ये मंदीची शक्यता वाढली आहे. सध्याच्या या ‘उदासीन जगात’ भारत एका वाढीच्या टप्प्यावर आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत महागाई सहा टक्क्यांच्या पातळीवरून खाली येईल.
महागाई छळणारच...कच्च्या तेलासह जागतिक वस्तूंच्या किमती खाली आल्या असताना, भूराजकीय घडामोडींमुळे भविष्यात काय होईल, याबाबत अनिश्चितता आहे. याशिवाय, देशांतर्गत सेवा क्षेत्रातील वाढीमुळे किमतींवरही परिणाम झाला कारण कंपन्या उत्पादन खर्चावर खर्च करत आहेत. या बाबी लक्षात घेत आणि कच्च्या तेलाची सरासरी किंमत १०० डॉलर प्रति बॅरल गृहीत धरून २०२२-२३ मध्ये मुख्य महागाई अपेक्षेपेक्षा जास्तच म्हणजे ६.७ टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
महागाई कधी कमी होईल ? चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत महागाई दर ६.६ टक्के असेल. चौथ्या जानेवारी-मार्च तिमाहीत महागाई दर ६ टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच ५.९ टक्के असेल, असे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे महागाई सध्या तरी छळणार आहे.
महागाईची कारणे? रशिया-युक्रेन युद्धामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळीमहागाई गेल्या दहा महिन्यांपासून ६ टक्क्यांच्या वर आहे.उत्पादन खर्चात झालेली वाढ. कच्च्या तेलाच्या किमतीआयात वाढल्याचा परिणाम
देशाचा विकासदर घटवला बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी (२०२२-२३) देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने विकास दर सात टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. भूराजकीय वातावरण आणि जागतिक आर्थिक मंदीची भीती यामुळे बँकेने वाढीचा अंदाज कमी केला आहे.
रिझर्व्ह बँकेवर बाजार रुसलाआरबीआयने महागाई रोखण्यासाठी पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केल्याने तसेच परकीय गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने शेअर बाजारात २१५ अंकांनी घसरण झाली. ही सलग चौथी घसरण आहे. घसरणीमुळे बाजार ६२,४१० अंकांवर स्थिरावला. एनटीपीसीला सर्वाधिक नुकसान झाले.
पेमेंटसाठी ग्राहकांना निधी ‘ब्लॉक’ करण्याची सुविधाहॉटेल बुकिंग, भांडवली बाजारात शेअर्सची खरेदी-विक्री यासारख्या विविध व्यवहारांसाठी लोक लवकरच त्यांच्या खात्यातील निधी ‘ब्लॉक’ करू शकतील आणि यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) द्वारे पेमेंट करू शकतील. यासाठी आरबीआयने यूपीआयमधील एक-वेळची रक्कम ‘ब्लॉक’ करण्याची आणि ती वेगवेगळ्या कारणांसाठी (सिंगल ब्लॉक आणि मल्टिपल डेबिट) कपात करण्याची सुविधा जाहीर केली. यामुळे व्यवहारांमध्ये वाढ होण्याचा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.
आरबीआय म्हणते...अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत. ती यापुढेही जलद आर्थिक विकास दर साध्य करणारी मोठी अर्थव्यवस्था राहील.जागतिक मंदी आणि प्रदीर्घ जागतिक तणावामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती ताणली गेली आहे. तो सर्वात मोठा धोका आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत रुपयाची अस्थिरता मर्यादित आहे. चालू खात्यातील तूट अधिक नाही. परकीय चलन साठा ५५१.२ अब्ज डॉलर या समाधानकारक पातळीवर बँकांमधील रोखीची स्थिती अतिरिक्त आहे. रब्बी हंगामातील पेरणी ६.८ टक्के अधिक आहे.
सोन्याच्या किमतीच्या जोखमीपासून बचावासाठी...आरबीआयने स्थानिक युनिट्सना आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये सोन्याच्या किमतीतील जोखमेपासून वाचण्यासाठी मंजुरी दिली. आतापर्यंत यासाठी मंजुरी देण्यात आली नव्हती.