नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुंतवणूकदारांना महत्त्वाचा आणि सावधानतेचा सल्ला दिला आहे. गुंतवणूकदारांनी अधिकतम नफा मिळविण्याच्यादृष्टीने किंवा जास्त व्याजदराने परतावा मिळण्यासाठी गुंतवणूक करताना काळजी घ्यायला हवी, असे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. रविवारी 5 लाख रुपयांपर्यंतच्या विमा जमाठेव योजनेसंदर्भातील कार्यक्रमात ते बोलत होते. जास्त व्याजदरासोबत जास्त रिस्कही असते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आपल्याला अधिकतम परतावा मिळावा या उद्देशाने गुंतवणूकदार विविध योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करतात. तसेच, जादा व्याजदराच्या अपेक्षेने शेअर मार्केट असेल किंवा इतर विमा पॉलिसीज असतील, त्यामध्ये मोठी गुंतवणूक करतात. मात्र, कालांतराने काही गुंतवणुकदारांची फसवणूक झाल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळेच, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुंतवणूकदारांना सावधनतेचा इशारा दिला. अधिक व्याजाच्या आमिषाने पैसे गुंतविणाऱ्यांना जास्त जोखीम स्वीकारावी लागत असते. त्याचप्रमाणे पैसे बुडण्याचा धोकाही जास्त असतो. त्यामुळे सावधपणे गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
९० दिवसांत ५ लाखांपर्यंतची रक्कम मिळणार
गेल्या वर्षी जमा ठेव विमा आणि कर्ज हमी सुधारणा विधेयक संसदेने मंजूर केले होते. कोणत्याही बँकेवर आरबीआयने प्रतिबंध लावल्यास ९० दिवसांच्या आत ठेवीदारांना त्यांच्या ठेवीपैकी ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येते. यासंबंधी माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की अनेक दशकांपासून ही समस्या भेडसावत होती. ती ज्या पद्धतीने सोडविण्यात आली, त्याचा आजचा दिवस साक्षीदार आहे. वर्षभरात एक लाखाहून अधिक ठेवीदारांना १३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत मिळाली आहे. यामुळे खातेधारकांचा बँकिंगवरील विश्वास वाढल्याचेही मोदींनी सांगितले आहे.