मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याचं धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यात पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोकसीचं नावही समाविष्ट आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती.
माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी यासाठी ही माहिती मागवली होती कारण राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या दोघांनीही उत्तर दिले नव्हते. म्हणूनच मी आरटीआय अंतर्गत हा अर्ज केल्याचं त्यांनी सांगितले.
जे सत्य केंद्र सरकारने लपवलं त्याची माहिती आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी २४ एप्रिलच्या उत्तरामध्ये दिली आहे. ज्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
- This list is NOT new & was published by The Wire earlier. It's shocking that RBI claims they haven't updated it since 30 Sep, 2019.
— Saket Gokhale (@SaketGokhale) April 27, 2020
- RBI also claims that list of overseas borrowers is exempt from disclosure - means they WILL NOT name willful defaulters in tax havens.
(2/2)
आरबीआयच्या उत्तरात ६८ हजार ६०७ कोटी रक्कमेचा थकबाकी तसेच तांत्रिकदृष्ट्या / हेतूपूर्वक राइट ऑफ (बुडवलेली) रक्कमेचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची अशी कर्जे राइट ऑफ करण्यात आली आहेत. देशातील सर्वोच्च बँकेने सुप्रीम कोर्टाच्या १६ डिसेंबर २०१५ च्या निकालाचा हवाला देत कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास नकार दिला आहे.
या ५० कर्जबुडव्यांच्या यादीत चोकसीच्या मालकीची गितांजली जेम्स लिमिटेड पहिल्या स्थानावर आहे. चोक्सीच्या कंपन्यांनी एकूण ५ हजार ४९२ कोटींचे कर्ज घेतलं होतं. तर गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे १ हजार ४४७ आणि १ हजार १०९ कोटींचे कर्ज घेतले होते. मेहुल चोकसीने अँटिगाचे नागरिकत्त्व मिळवले आहे. तर चोकसीचा भाचा आणि पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असणारा नीरव मोदी हा लंडनमध्ये आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आरआयई अॅग्रो लिमिटेडचा समावेश आहे. या कंपनीने ४ हजार ३१४ कोटींचे कर्ज घेतले होते. या कंपनीचे संचालक संदीप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांची मागील वर्षभरापासून ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत. तिसऱ्या नंबरवर जितेन मेहता यांची विन्सम डायमंड्स अॅण्ड ज्वेलरी या कंपनीचा समावेश असून कंपनीने ४ हजार ७६ कोटींचे कर्ज घेतले होते. सीबीआयकडून वेगवेगळ्या बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी या कंपनीची चौकशी सुरु आहे.
दोन हजार कोटींहून अधिक कर्ज घेणाऱ्या कंपन्याच्या यादीमध्ये कानपूरमधील रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सहभाग आहे. ही कंपनी कोठारी ग्रुपचा भाग असून कोठारी ग्रुपने २ हजार ८५० कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचबरोबर कुडोस केमी, पंजाब (२ हजार ३२६ कोटी), बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या मालकीची रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड, इंदूर (२ हजार २१२ कोटी) आणि झूम डेलव्हलपर्सं प्रायव्हेट लिमिटेड, ग्वालियर (२ हजार १२ कोटी) या कंपन्यांचाही या यादीत समावेश आहे. या यादीत १८ कंपन्यांची १ हजार कोटी कर्ज घेतल्याची माहिती आहे. त्यात हरिश मेहता यांची अहमदाबादमधील फॉरएव्हर प्रेशियस ज्वेलरी अॅण्ड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेड (१ हजार ९६२ कोटी) आणि फरार असणाऱ्या विजय माल्याची किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड (१ हजार ९४३ कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे. तर एक हजार कोटींहून कमी कर्ज घेतलेल्या २५ कंपन्यांची यादी आहे.
५० मोठ्या कर्जबुडव्यांपैकी ६ जण हे हिरे तसेच ज्वेलरी उद्योगाशी संबंधित आहेत. या प्रकरणातून कोणताही उद्योग वाचला नाही. यामध्ये आयटी, बांधकाम, ऊर्जा, सोने-हिरे व्यापार, औषध क्षेत्रातील कंपन्यांची नावे मोठ्या प्रमाणात आहेत.