मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी (HDFC) ला रिझर्व्ह बँकेने (RBI) ने मोठा झटका दिला आहे. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आधीच ग्राहक त्रस्त असताना आणखी ग्राहक वाढविण्याच्या योजना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. एचडीएफसीला सेवा सुधारत नाही तोपर्यंत डिजिटल लाँचिंग, नवीन क्रेडिट कार्ड वाटप रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हा आदेश तात्पुरता असला तरीही गेल्या दोन वर्षांत हा तिसरा झटका आहे. आरबीआयने २ डिसेंबरलाच हे आदेश दिले आहेत. मुंबई शेअर बाजाराला बँकेने याची माहिती दिल्याने हा प्रकार उघड झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एचडीएफसीची सेवा ढासळली होती. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सह इतर पेमेंट सुविधांमध्ये ग्राहकांना सातत्याने समस्या येत होत्या. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरु होता. २१ नोव्हेंबरला बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टिममध्ये मोठी गडबड आढळून आली होती. ही समस्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीज गेल्याने उद्भवली होती.
HDFC ने वर्षभरापूर्वी नवीन अॅप लाँच केले होते. मात्र, ते अॅप नीट काम करत नसल्याच्या लाखो तक्रारी आल्यानंतर जुने अॅप पुन्हा कार्यन्वित करण्याची बँकेवर नामुष्की ओढवली होती. HDFC डिजिटल 2.0 प्लॅटफॉर्म लाँच करण्याच्या मोठ्या तयारीला लागली होती. अशातच आरबीआयने रोखल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासह आरबीआयने अन्य व्यवसाय वृद्धी योजनांवर रोख लादली आहे. यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड देण्यावरही रोख लागली आहे.
आरबीआयने दिलेल्या आदेशात बँकेच्या बोर्डाला सुनावले असून समस्यांचा तपास करून त्याला उत्तरदायी कोण असेल याची जबाबदारी निश्चित करण्याचे म्हटले आहे. तसेच जेव्हा बँक यावर काम करेल आणि समस्या सोडवलेली दिसेल तेव्हाच हे निर्बंध हटविणार असल्याची सक्त ताकीद आरबीआयने दिली आहे.
HDFC बँकेनीही याबाबात स्पष्ट केले आहे की, आरबीआयच्या आवश्यकतेनुसार बँकेने अनुपालन केल्यानंतर हे निर्बंध हटवले जातील. बँकेने असं म्हटलं आहे की, गेल्या दोन वर्षांत आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बॅलन्स संदर्भातील काम लवकरच बंद करण्याबाबत बँक वेगाने काम सुरू ठेवेल आणि या संदर्भात नियामकांबरोबरच काम करत राहील.