- प्रसाद गो. जोशी
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने पतधोरणामध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली असली तरी रोखतेचे प्रमाण चांगले असल्याने व्याजदर कायम ठेवले आहेत. सप्ताहाच्या प्रारंभी दोलायमान अवस्थेत असलेल्या शेअर बाजाराने याचे जोरदार स्वागत केले असून, सप्ताहामध्ये बाजार वाढीव पातळीवर बंद झाला आहे. देशाच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काही प्रमाणात वाढ होत असली तरी अद्याप आकडेवारी घटच दाखवत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण दिसून आले.
मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात अस्थिरता दिसून आली. बाजार वाढीव पातळीवर सुरू झाला असला तरी त्यानंतर काही काळ घसरण स्पष्टपणे जाणवत होती. सप्ताहाच्या अखेरीस मात्र गुंतवणूकदारांनी काही प्रमाणामध्ये खरेदी केल्याने बाजारात तेजीचे वारे वाहू लागल्याचे दिसून आले.
सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ९४९६.८० कोटी रुपयांची खरेदी केलेली दिसून आली. मात्र देशांतर्गत वित्तसंस्थांची विक्री सुरूच आहे. या संस्थांनी गतसप्ताहामध्ये २१३३.८४ कोटी रुपयांची विक्री केली आहे.
देशाच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्राची जुलै महिन्यातील कामगिरी जाहीर झाली आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये घसरण झाली असली तरी जून महिन्यापेक्षा कामगिरीमध्ये सुधारणा दिसून येत आहे. यामुळेच काही ठरावीक समभागांना मागणी वाढत असल्याचे बाजारामध्ये दिसून आले. अमेरिकेमध्ये वाढलेली बेकारांची संख्या आणि युरोपियन बॅँकेने जाहीर केलेले पॅकेज हे बाजाराची चिंता वाढविणारे ठरले. त्यातच जगभरातील कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही लॉकडाऊन आणखी वाढण्याचे संकेत देणारी आहे. असे झाल्यास जगभरातील इंधनाची मागणी कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या किमतींमध्ये घसरण होत असल्याचे दिसले.
परकीय चलन गंगाजळी
देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये ३१ जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात ११.९४ अब्ज डॉलरची वाढ होऊन ती ५३४.५७ अब्ज डॉलर अशी झाली आहे. दर आठवड्यामध्ये या गंगाजळीचा उच्चांक सुरू आहे. देशाच्या १३.४ महिन्यांच्या आयात खर्चाच्या बरोबरीमध्ये परकीय चलनाची गंगाजळी पोहोचली आहे, ही समाधानाची बाब आहे.
रिझर्व्ह बॅँकेच्या पतधोरणामुळे बाजारामध्ये परतले तेजीचे वारे
सप्ताहाच्या प्रारंभी दोलायमान अवस्थेत असलेल्या शेअर बाजाराने याचे जोरदार स्वागत केले असून, सप्ताहामध्ये बाजार वाढीव पातळीवर बंद झाला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:16 AM2020-08-10T01:16:09+5:302020-08-10T01:16:18+5:30