न्यूयॉर्क : नोटाबंदी तसेच ब्रेक्झिट आणि अमेरिकी निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने प्रशंसनीय कामगिरी केली; त्यामुळे रुपया अस्थिर होण्यापासून वाचला, असे प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी केले.
कोलंबिया विद्यापीठातील ‘दीपक अॅण्ड नीरा राज सेंटर आॅन इंडियन इकॉनॉमिक पॉलिसीस’ या केंद्राच्या वतीने ‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी’ या विषयावर पनगढिया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, नोटाबंदीनंतर नव्या नोटा चलनात आणण्याचे काम किती मोठे होते, याची कल्पना नोटाबंदीवर टीका करणारांना येऊ शकत नाही. नोटाबंदीनंतर डिजिटलीकरणासाठी उपाय योजना केल्या जात आहेत.
पनगढिया म्हणाले की, काही लोक नोटाबंदीवर टीका करीत आहेत. केवळ सहा टक्के काळा पैसा होता, असा युक्तिवाद त्यांच्याकडून केला जात आहे. काळा पैसा जर सहा टक्केच असता तर मोठ्या शहरांत ज्या प्रमाणात जुन्या नोटांसाठी कमिशनचे प्रकार घडले तसे घडले नसते. जुन्या नोटांसाठी असे डिस्काउंटवरील व्यवहार का झाले? नोटाबंदीतून मोदी यांनी कठोर संदेश दिला आहे. गृहीत धरू नका. तुम्ही जर गैरवर्तन करणार असाल, तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. काळ्या पैशाविरुद्ध लढणे हेच सरकारचे धोरण असून, नोटाबंदी हा त्याचाच एक भाग होता. कुठल्या तरी भ्रमात राहून हा निर्णय घेतलेला नव्हता. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यास पंतप्रधान वचनबद्ध आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीने रुपयाचे अस्थैर्य रोखले
नोटाबंदी तसेच ब्रेक्झिट आणि अमेरिकी निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने प्रशंसनीय कामगिरी केली
By admin | Published: February 8, 2017 02:11 AM2017-02-08T02:11:22+5:302017-02-08T02:11:22+5:30