Join us

RBIचा सर्वसामान्यांना जबर धक्का, होमलोनसह सर्व कर्जे महागणार, रेपोरेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 10:44 AM

RBI Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना आज जोरदार झटका दिला आहे. आरबीआयने यावर्षी सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना आज जोरदार झटका दिला आहे. आरबीआयने यावर्षी सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट ५.९० टक्क्क्यांवरून वाढून  ६.२५ टक्क्यांवर पोहोचणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता होमलोनसह सर्वप्रकारची कर्जे महागणार आहेत.  एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपोरेट वाढवण्याची घोषणा केली.  

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आज सर्वसामान्या कर्जदारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून आतापर्यंत पाचवेळा रेपोरेट वाढवला असून, तेव्हापासून आतापर्यंत २.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरबीआयने ४ मे रोजी ०.४ टक्के, ८ जून रोजी ०.५ टक्के, ५ ऑगस्ट रोजी ०.५ टक्के आणि ३० सप्टेंबर रोजी रेपोरेटमध्ये ०.५ टक्क्यांनी वाढ केली होती.  मे महिन्यात व्याजदरांमध्ये अचानक ०.४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. रेपो रेट वाढण्याचा परिणाम होमलोन, कार लोन आण पर्सनल लोन यांच्या ईएमआयवर पडणार आहे. आरबीआयकडून २०२३ मध्ये रिटेल महागाई दराचं अनुमान हे ६.७ टक्के कायम ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, पुढील वर्षभर महागाईचा दर हा ४ टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता आहे. तसेच २०२३ या आर्थिक वर्षात जीडीपीमधील वाढ ही ६.८ टक्के एवढी राहण्याची शक्यता आहे.

आरबीआयकडून रेपोरेटमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. महागाईपासून दिलासा मिळाला तरी रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये २५ ते ३५ बेसिस पॉईंटने वाढ करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून देशातील महागाई ही उच्च स्तरावर आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये महागाईपासून दिलासा मिळाला होता. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रपैसाअर्थव्यवस्था