Join us

RBIची २ बँकांवर कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश, ठेवीदारांच्या पैशांच काय होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 8:57 AM

RBI News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा दोन बँकांवर कठोर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा दोन बँकांवर कठोर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला आहे. यामध्ये कर्नाटकमधील तुमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील सातारा येथील हरिहरेश्वर बँकेचा समावेश आहे. या दोन्ही बँकांकडे पुरेसा निधी आणि उत्पन्नाची शक्यता उरली नव्हती, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले. हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या प्रकरणी कारभार बंद करण्याचे आदेश ११ जुले २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत. 

बँकेतील सुमारे ९९.९६ टक्के ठेवीदारांना ठेवींचा विमा आणि लोन गॅरंटी निगम यामधून एकूण जमा रक्कम दिली जाईल. तर श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या सुमारे ९७.८२ टक्के ठेवीदारांना डीआयसीजीसीमधील त्यांच्या ठेवींची पूर्ण रक्कम परत केली जाईल. प्रत्येक ठेवीदार डीआयसीजीसीकडून आपल्या ५ लाख रुपयांपर्यंतची जमा रक्कम विम्याच्या दाव्यातून परत मिळवण्यासाठी हक्कदार असेल.

परवाना रद्द झाल्यानंतर या बँकांना बँकेशी संबंधित व्यवहार प्रतिबंधित करण्यात आले आहे. यामध्ये इतर बाबींसोबत ठेवी स्वीकारणे आणि परत देण्याचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, दोन्ही सहकारी बँकांकडे पुरेशा ठेवी आणि उत्पन्नाची शक्यता नाही आहे. दोन्ही बँकांची सध्याची आर्थिक स्थिती पाहता या बँका ठेवीदारांना पूर्ण पैसे देण्यास असमर्थ आहेत.

याआधी काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून चालणाऱ्या दोन सहकारी बँकांचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर दोन्ही बँकांचं कामकाच ५ जुलै २०२३ पासून बंद झालं होतं. कारवाई करण्यात आलेल्या बँकांमध्ये बुलढाणा येथील मलकापूर शहरी सहकारी बँक लिमिटेड आणि बंगलुरू येथील सुश्रुती सौहार्द सहकार बँक यांचा समावेश होता.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रमहाराष्ट्र