मुंबई : घोटाळेबाज मद्यसम्राट विजय मल्ल्याने बँकांकडून मिळालेल्या कर्जाचा गैरवापर आरसीबी व फोर्स इंडियाच्या माध्यमातून ‘मनी लॉन्डरिंग’साठी केला. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी विशेष सत्र न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपपत्रात हे नमूद करण्यात आले आहे.
स्टेट बँकेच्या नेतृत्त्वातील बँकांच्या समूहाने विजय मल्ल्याला ६,०२७ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. किंगफिशर एअरलाइन्सच्या दैनंदिन खर्चासाठी हे कर्ज घेत असल्याचे मल्ल्याने कागदोपत्री दाखवले. प्रत्यक्षात मात्र कर्जाच्या रक्कमेचा उपयोग त्याने स्वत:साठी आलिशान चार्टर्ड विमान खरेदी करण्यासह अन्य कामांसाठी केला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मल्ल्याने त्याला मिळालेल्या कर्जाची रक्कम ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’ क्रिकेट संघ व लंडनमध्ये नोंदणीकृत असलेल्या ‘फोर्स इंडिया फार्म्युला वन’ च्या माध्यमातून वैयक्तिक कामासाठी वापरली. हे कर्ज बुडवून त्याने भारताने पोबारा केल्यानंतर आता या कर्जाची रक्कम व्याजासह ९९९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
हा पैसा वापरण्यासाठी मल्ल्याने बनावट कंपन्याही स्थापन केल्या होत्या. किंगफिशरचा माजी कर्मचारी असलेल्या हितेश पटेलच्या नावे मॉरिशसमध्ये वेलिंग नरीयन लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. त्या कंपनीकडून विमान खरेदी करीत असल्याचे दाखवत मल्ल्याने या कर्जातील रक्कम देऊ केली.
पण ती रक्कम त्या श्रेणीतील विमानाच्या मूळ किमतीहून खूप अधिक होती. कंपनीला दिलेला हा पैसा विजय मल्ल्याने नंतर स्वत:कडे वळवला, असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
>आरोपपत्र ९०० कोटी रुपयांविषयी
विजय मल्ल्यासह अन्य आठ जणांविरुद्ध ईडीने वर्षभरापूर्वी पहिले आरोपपत्र दाखल केले होते. आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याबद्दल ते आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता या आरोपपत्रात नमूद असलेला घोटाळा त्यापेक्षा खूप मोठा आहे.
‘आरसीबी’ व ‘फोर्स वन’चा मल्ल्याने केला गैरवापर!
घोटाळेबाज मद्यसम्राट विजय मल्ल्याने बँकांकडून मिळालेल्या कर्जाचा गैरवापर आरसीबी व फोर्स इंडियाच्या माध्यमातून ‘मनी लॉन्डरिंग’साठी केला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:42 AM2018-06-20T00:42:24+5:302018-06-20T00:42:24+5:30