मुंबई - अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व रिलायन्स टॉवर्स या दोन कंपन्यांच्या १४४ खात्यांत फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. अमेरिकन टॉवर्स कंपनीच्या (एटीएल) प्रकरणात रिलायन्सने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती आहे.रिलायन्स कम्युनिकेशन्स वायरलेस दूरसंचार क्षेत्रात कार्यरत होती. भरमसाठ तोट्यामुळे कंपनीने व्यवसाय बंद केला. त्या वेळी कंपनीच्या डोक्यावर ४६ हजार कोटींचे कर्ज होते. आरकॉमकडून एटीएलला २३० कोटी वसूल करायचे होते. त्यासाठी हायकोर्टात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान आरकॉमने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कंपनीच्या खात्यात अत्यल्प पैसे असल्याचे उघड झाले.आरकॉमच्या एकूण ११९ बँक खात्यांमध्ये १७ कोटी ८६ लाख आहेत. रिलायन्स टॉवर्स या उपकंपनीच्या २५ खात्यांत १ कोटी ४८ लाख आहेत. दोन्ही मिळून कंपनीच्या खात्यात फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. त्यामुळेच एटीएलच्या २३० कोटींची थकबाकी देणे शक्य नाही, असे कंपनीने म्हटले आहे.कर्जपरतफेडीसाठी आरकॉमने त्यांच्या मालमत्तेची रिलायन्स जिओला १८ हजार कोटींना विकण्याचा निर्णय घेतला होता. रिलायन्स जिओची तयारीही अंतिम टप्प्यात होती, पण त्याच वेळी एरिक्सन कंपनीने ५५० कोटींच्या वसुलीसाठी या व्यवहाराविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.लवादाकडे धाव घेणार?एकीकडे एटीएल कंपनीचे २३० व दुसरीकडे एरिक्सनचे ५५० कोटी, अशा एकूण ७८० कोटी रुपयांचा भरणा करताना खात्यात मात्र फक्त १९ कोटी रुपये आहेत. यातूनच अनिल अंबानी सध्या मोठ्या आर्थिक संकटात असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे त्यांना अखेरीस दिवाळखोरी प्रक्रियेसाठी राष्टÑीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेण्याखेरीज अन्य पर्याय नसेल, असे चित्र आहे.
आरकॉमच्या खात्यात केवळ १९ कोटीच?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 7:09 AM