सध्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम स्थानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आहेत. पण देशात असे अनेक उद्योगपती पुढे येत आहेत, जे श्रीमंतांच्या यादीत सामील होत आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात नव्यानं पाऊल टाकणारी तरुण पिढी मोठ्या उद्योगपतींनाही स्पर्धा देत आहेत.
असंच एक नाव म्हणजे जयंती चौहान. ज्या आता मोठ्यामोठ्या उद्योजकांना टक्कर देत आहेत. जयंती चौहान या बाटलीबंद पाण्याच्या क्षेत्रात बिस्लेरी या अव्वल ब्रँडचं नेतृत्व करत आहेत. बिस्लेरीसोबतच जयंती चौहान यांनी त्यांच्या कंपनीला पुढे नेण्यासाठी आणखी नवीन उत्पादनं बाजारात आणली आहेत.
अधिग्रहणापासून वाचवलं
जयंती चौहान यांनी कंपनीची धुरा तेव्हा सांभाळली जेव्हा कंपनी दुसऱ्या कंपनीच्या हाती जाण्याच्या तयारीत होती. रमेश चौहान यांनी या कंपनीला एका शिखरावर पोहोचवलं. परंतु वयापरत्वे त्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जयंती चौहान या त्यांच्या एकूलत्या एक कन्या आहेत.
...आणि सूत्रं स्वीकारली
त्यामुळेच कंपनीला कोणीही उत्तराधिकारी नाही असे सर्वांनाच वाटलं. यानंतर रमेश चौहान यांनी टाटा समूहाला आपली कंपनी विकण्याचा निर्णय घेतला होता. तोपर्यंत जयंती चौहान या कंपनीची सूत्रं हाती घ्यायला तयार नव्हत्या. पण टाटांसोबत करार झाला नाही, तेव्हा जयंती यांनी कंपनीचा कारभार स्वीकारण्याचं ठरवलं.
जयंती यांचं बालपण मुंबई, दिल्ली आणि न्यूयॉर्कमध्ये गेलं. त्यांनी लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडाइझिंगमधून प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा अभ्यास केला.
अंबानी टाटांना टक्कर
बिस्लेरीनंही कोल्ड्रिंक्सच्या बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच मुकेश अंबानी यांनी कोल्डड्रिंक क्षेत्रात प्रवेश केला आहे. प्युअर ड्रिंक्स ग्रुपचं अधिग्रहण करून त्यांनी कॅम्पाकोला नावाचा ब्रँड सुरू केलाय. तर दुसरीकडे टाटा समूह कॉपर आणि हिमालयन वॉटर ब्रँडमध्येही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. या दोन्ही दिग्गजांना थेट स्पर्धा देण्याचा जयंती चौहान यांचा विचार आहे. अलीकडेच बिस्लेरीनं कार्बोनेटेड कोल्डड्रिंक्स बाजारात आणली आहेत.