नवी दिल्ली : जागतिक घडामोडींमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास देश सक्षम असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. या घडामोडींमध्ये अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात घट करण्याच्या आर्थिक भूमिकेचाही समावेश आहे.
सीतारामन यांनी रविवारी उद्योग संस्था फिक्कीसोबत केलेल्या अर्थसंकल्पोत्तर चर्चेत सांगितले की, सरकार जागतिक घडामोडींचा कोणत्याही प्रकारे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ देणार नाही. यावेळी त्यांनी कॉर्पोरेट जगताला अर्थव्यवस्थेतील पुनरुज्जीवनाचा लाभ घेण्याचे आणि गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन केले. अर्थमंत्री म्हणाल्या की, आता टीम इंडिया म्हणून आपल्याजवळ सावरण्याची संधी आहे. अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन अगदी स्पष्ट दिसत असल्याच्या टप्प्यावर आपण आहोत. या पुनरुज्जीवनामुळे भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनेल. पुढील आर्थिक वर्षातही हीच गती कायम राहण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
२०४७ मध्ये भारत सर्वांत विकसित देश
भारत २०४७ पूर्वी जगातील सर्वांत विकसित देशांमध्ये असेल. निर्गुंतवणुकीबाबत त्या म्हणाल्या की, सरकारच नाही तर खासगी उद्योगधंदेही त्यांचे व्यवसाय विकण्याबाबत घाईने निर्णय घेत नाहीत आणि सरकारच्या बाबतीत हे अधिक खरे आहे. निर्गुंतवणुकीच्या दिशेने पावले टाकली जात आहेत, असे त्या म्हणाल्या.
...ती संधी सोडू नका
कोरोना महामारीनंतर जग बदलले आहे आणि यावेळी ‘बस’मध्ये चढताना भारत मागे राहणार नाही, याची काळजी उद्योगांनी घ्यायला हवी. जागतिक आर्थिक संकटाच्या काळात भारताने अशी संधी गमावली होती. २०१२-१३ आणि २०१३-१४ मध्ये आलेल्या संकटांतून सगळ्यांना धडा मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.