नवी दिल्ली : कोविड-19 महामारीच्या काळात रिअल इस्टेट मार्केटमध्ये मंदीचा परिणाम दिसून आला. पण, यादरम्यान लोकांना वर्क फ्रॉम होम कल्चर आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मोठ्या घराचे महत्त्वही समजले. अशा परिस्थितीत कोरोना साथीच्या आजारानंतर रिअल इस्टेटमध्ये अचानक तेजी दिसून आली. विशेषतः भारतातील सात शहरांमध्ये लोकांनी मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली आणि घरे आणि फ्लॅट्स खरेदी केले. अशा स्थितीत यंदा निवासी युनिटच्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदवली जाईल, असा अंदाज आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2014 मध्ये जिथे 3.43 लाख निवासी युनिट्स विकल्या गेल्या होत्या. तर, यावर्षी हा आकडा 3.6 लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ही आकडेवारी भारतातील फक्त सात शहरांची आहे. जिथे लोक मालमत्तेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. यामध्ये दिल्ली-एसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आणि चेन्नई यांचा समावेश आहे.
भारतातील निवासी युनिट्सच्या एकूण विक्रीत या सात शहरांचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक असणे अपेक्षित आहे. रिपोर्ट्सनुसार, मालमत्ता सल्लागार कंपनी अॅनारॉकने (Anarock) 2022 मध्ये भारतातील प्रथम श्रेणी निवासी बाजाराचा डेटा गोळा केला आहे. आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत 2.73 लाख निवासी युनिट्सची विक्री झाली.
मोठ्या विकासकांवर अधिक विश्वास
अॅनारॉकच्या अहवालात असे म्हटले आहे की, लोकांनी खरेदी केलेल्या बहुतेक मालमत्ता मोठ्या आणि ब्रँडेड विकासकांकडून होत्या. हे विकासक ब्रँडेड किंवा श्रेणी ए सूचीबद्ध कंपन्या आहेत आणि गेल्या 10 वर्षांपासून किंवा त्याहून अधिक काळ रिअल इस्टेट व्यवसायात आहेत. या विकासकांनी वेळेत प्रकल्प पूर्ण केल्याने लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, 2022 हे वर्ष रिअल इस्टेटसाठी, विशेषत: निवासी श्रेणीसाठी चांगले आहे. त्याचबरोबर, या सात शहरांव्यतिरिक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्येही घरांची मागणी जोर धरू लागली आहे.