नवी दिल्ली- लोकसभेत विरोधकांकडून पेट्रोलच्या दरवाढीवरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी उत्तर दिलं आहे. विरोधकांनी पेट्रोल एवढं महाग का?असा प्रश्न विचारल्यानंतर शुल्क यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पेट्रोलची खरी किंमत 70 रुपये नव्हे, तर 34 रुपये आहे. पेट्रोलवरचा टॅक्स आणि डीलर्स कमिशनला हटवल्यास दिल्ली-एनसीआरमध्ये प्रतिलिटर पेट्रोलसाठी सामान्य माणसाला 34 रुपये मोजावे लागतील. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी लेखी स्वरूपात संसदेत ही माहिती दिली होती.पेट्रोलवर टॅक्स आणि डीलर कमिशन 96.9 टक्के पडतं. तर डिझेलवर तोच टॅक्स 60.3 टक्के लागतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं ऑक्टोबरमध्ये इंधनाच्या किमतीवरच्या एक्साइज ड्युटीमध्ये कपात केली होती.
- सरकारची होते भरपूर कमाई- केंद्र सरकारनं गेल्या वर्षी पेट्रोलच्या माध्यमातून 73,516.8 कोटी रुपये, तर डिझेलवर 1.5 लाख कोटी रुपयांची एक्साइज ड्युटी वसूल केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय भावातील चढाओढीनुसार बदलत असतात.
- असे वसूल केले जातात पैसे- 19 डिसेंबरला पेट्रोलची किंमत 70.63 रुपये प्रतिलिटर होती. त्यात 17.98 रुपये सेंट्रल एक्साइज ड्युटी, 15.02 राज्य व्हॅट आणि डिलरला 3.59 रुपयांचं कमिशन मिळतं. तर डिझेलची किंमत 64.54 रुपये(13.83 रुपये सेंट्रल एक्साइज ड्युटी, 9.15 रुपये स्टेट वित्त आणि 2.53 रुपये डीलर कमिशन ) वसूल केले जातात.