बंगळुरू : प्रवेश पातळीवर आॅटोमेशनचे प्रमाण वाढल्यामुळे देशातील आयटी कंपन्यांनी नव्या भरतीचे प्रमाण प्रचंड कमी केले आहे. त्यामुळे १५0 अब्ज डॉलरच्या या उद्योगामधील चित्र पूर्णत: बदलले आहे. बीपीओ आणि अॅप्लिकेशन व इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट या परंपरागत व्यवसायात आयटी कंपन्या आॅटोमेशनला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे नव्या इंजिनीअरची भरती अत्यल्प प्रमाणात केली जात आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत विदेशींच्या भरतीवर बंधने आणल्यामुळे अमेरिकेतील भारतीय इंजिनीअरच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशा प्रकारे आयटी क्षेत्रात नोकऱ्या शोधणाऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. इव्हरेस्ट ग्रुपचे पीटर बेंडर-सॅम्युएल यांनी सांगितले की, यांत्रिकीकरणामुळे आयटी कंपन्यांच्या विदेशातील ८0 टक्के नोकऱ्या तसेच वित्त आणि अकाउंटिंग क्षेत्रातील भारतातील ३0 ते ४0 टक्के नोकऱ्या संपणार आहेत. सर्वच सेवांत ३0 ते ८0 टक्क्यांपर्यंत नोकऱ्या संपत असल्याचे चित्र आहे. या स्थितीतून सावरायला उद्योगाला किमान १0 वर्षे लागतील. यंदा व्यवसायावर ३ टक्के परिणाम अपेक्षित आहे.जागतिक बँकेच्या अहवालानुसार, आॅटोमेश्नमुळे भारतातील प्रत्येक १0 नोकऱ्यांपैकी ७ नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. विप्रोचे एचआर प्रमुख सौरभ गोविल यांनी सांगितले की, कंपन्या नवी भरती करण्याऐवजी आहे त्या कर्मचाऱ्यांचाच कौशल्य विकास करण्यावर भर देत आहेत. सर्वांत खालच्या टप्प्यातील नोकऱ्या आॅटोमेशनने खाऊन टाकल्या आहेत. इन्फोसिसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि एचआर प्रमुख रिचर्ड लोबो यांनी सांगितले की, साचेबद्ध कामे संगणकांद्वारे अधिक चांगल्या प्रकारे होतात. त्यामुळे या क्षेत्रातील नोकऱ्या संपत आहेत. इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत ५,७१९ नवे इंजिनीअर भरले. गेल्या वर्षी हा आकडा १७,१९६ होता. (वृत्तसंस्था)
आयटी कंपन्यांत भरतीला लगाम
By admin | Published: February 07, 2017 1:57 AM