वॉशिंग्टन - नोटाबंद आणि जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर घटून 6.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या आलेली मंदी ही अल्पकालीन बुडबुड्यासारखी असल्याचे अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेमधील मंदीसंदर्भात भाष्य करताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वरिष्ठ अधिकारी मॉरिस ऑब्स्टफेल्ड म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मंदी ही बुडबुड्यासारखी आहे. ही अवस्था लवकरच संपुष्टात येईल. अर्थव्यवस्थएमध्ये यावर्षी आलेली ही मंदी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन सकारात्मक आर्थिक वृद्धीच्या चित्रावर लागलेला तात्कालीक डाग आहे."
भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याबाबतही आपण निश्चिंत असल्याचे त्यांनी सांगितले,"सर्वसाधारणपणे सांगायचे तर भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. केंद्र सरकारने पूर्ण क्षमतेने पायाभूत सुधारणा लागू केल्या आहेत. ज्यात जीएसटीचा समावेश आहे. जीएसटीमुळे दीर्घकालीन लाभ होईल. व्यापारातील चांगल्या संधी आणि समाधानकारक मान्सून यांचाही भारतीय अर्थव्यवस्थेला लाभ होईल," असे ते म्हणाले. या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दोन अडथळे दिसून आले. त्यातील जीएसटी हा एक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर अडथळा आणणारे प्रभाव पाहिले गेले."
याआधी जागतिक बँकेनेसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही स्वाभाविक असून, जीएसटीचे हे तात्पुरते परिणाम आहेत. येत्या काही महिन्यांत ही मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल, असे सांगितले होते. जीएसटी लागू केल्याने भारतात अनेक सकारात्मक बदल होतील, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम म्हणाले होते. जीएसटीनंतरच्या तीन महिन्यांत अर्थव्यवस्थेत घसरण झाल्याचे जे पाहायला मिळाले आहे, त्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहू नका. हे चित्र बदलेल. आर्थिक आलेख उंचावेल, असा विश्वासही किम यांनी व्यक्त केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील व्यापाराला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच फळ येईल, असेही त्यांनी सांगितले. विदेशी गुंतवणूक भारतात यावी, यासाठीही प्रयत्न होत आहेत. पण निरक्षरता व आरोग्यविषयक आव्हानांना भारत तोंड देत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
भारतीय अर्थव्यवस्थेमधील मंदी बुडबुड्यासारखी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज
नोटाबंद आणि जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर घटून 6.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या आलेली मंदी ही...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 04:36 PM2017-10-11T16:36:48+5:302017-10-11T16:39:24+5:30