अमेरिकेत पुन्हा एकदा आर्थिक मंदीचे वारे घोंघावू लागले आहेत. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जीडीपीची आकडेवारी येण्याआधी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंदीची व्याख्याच बदलण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. अशावेळी भारतासाठी आनंद वार्ता आली आहे.
जीडीपीच्या आकड्यांतून आर्थिक मंदीचे संकेत दिसू शकतात अशी भीती बायडन यांना वाटू लागली आहे. सोमवारी त्यांनी अमेरिकेत आर्थिक मंदी येईल असे वाटत नाहीय, असे म्हटले आहे. याच आठवड्यात अमेरिकेतील जीडीपीचे आकडे येणार आहेत. गेल्यावेळी जीडीपी १.६ टक्क्यांनी घसरला होता. आताची घसरण वाचविण्यासाठी अमेरिकेची सेंट्रल बँक व्याज दर वाढवत चालली आहे. त्यामुळे मागणी कमी होईल अशी अपेक्षा अमेरिकेला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत थोडाशी तेजी दिसून येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील घसरण 2020 मधील कोरोना कालावधीपेक्षा वाईट होती.
याचवेळी ब्लूमबर्गकडून नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये या मंदीचे आशियाई देशांच्या अर्थव्यस्थेवर होणारे परिणाम सांगितले आहेत. यानुसार भारताला अर्थिक मंदीचा काहीच फटका बसणार नाही असे म्हटले आहे.
ब्लूमबर्गने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की श्रीलंका, दक्षिण कोरिया, जपान, चीन, तैवान, पाकिस्तान, मलेशिया या आशियातील अनेक देशांमध्ये आर्थिक मंदीची शक्यता सर्वाधिक आहे. या यादीत भारताला शेवटचे स्थान मिळाले आहे. श्रीलंकेत ८५ टक्के, न्यूझीलंडमध्ये ३३ टक्के, दक्षिण कोरियामध्ये २५, जपानमध्ये २५, चीनमध्ये २०, तैवानमध्ये २०, पाकिस्तानमध्ये २० टक्के मंदीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर भारतासाठी शून्य असा आकडा देण्यात आला आहे.