Join us  

Recession in America: ब्रिटननंतर अमेरिका मंदीच्या कवेत! भारतासह जगभरातील देश चिंतेत, डाऊ जोन्स गडगडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 10:41 AM

अमेरिकेत मंदीची भीती अधिक गडद झाली आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहे.

जगभराला चिंतेत टाकणारी घटना घडली आहे. ज्याची भीती होती तिच मंदी आता आवासून उभी ठाकली आहे. गेल्या महिन्यात ब्रिटनने मंदीची घोषणा केली होती, आता या मंदीने अमेरिकेलाही व्यापले आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्यानंतर गुरुवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी पडझड झाली. याचे परिणाम आता जागतीक अर्थव्यवस्थेवरही दिसणार आहेत. यामुळे भलेभले देश मंदीच्या चिंतेत अडकले आहेत. 

अमेरिकेत मंदीची भीती अधिक गडद झाली आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहे. अमेरिकी शेअर बाजार डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेजसाठी सप्टेंबरनंतरचा गुरुवार हा सर्वात वाईट दिवस ठरला आहे. डाऊ जोन्स 764.13 अंकांनी घसरून 33,202.22 वर आला. तर S&P 500 2.49 टक्‍क्‍यांनी घसरून 3,895.75 वर आला. Nasdaq Composite 3.23 टक्क्यांनी घसरून 10,810.53 वर आला. टेक हेव्ही इंडेक्सने २०२२ मधील तोटा 31 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. 

Apple Alphabet चे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले. अॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टच्या समभागांमध्ये 3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. नेटफ्लिक्सचे शेअर्स ८.६ टक्क्यांपर्यंत घसरले. नेटफ्लिक्स दर्शकांची संख्या कमी झाल्यानंतर जाहिरातदारांना पैसे परत करण्याची ऑफर देत असल्याचा अहवाल डिजिडेने दिल्यानंतर ही मोठी घसरण पहायला मिळाली. 

व्याजदरात वाढ झाल्यानंतर फेड रिझर्व्हचे लक्ष्य 4.25 ते 4.50 टक्क्यांच्या दरम्यान पोहोचले आहे. हा व्याजदर गेल्या 15 वर्षांतील म्हणजे 2007 नंतर सर्वाधिक आहे. अमेरिकेत तेव्हाही मंदी आली होती. ब्रिटन आधीच आर्थिक मंदीच्या गर्तेत आहे. वाढत्या महागाईने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुनक सरकारने करही दुप्पट, तिप्पट केले आहेत.  

टॅग्स :अमेरिकाअर्थव्यवस्था