लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगात एकीकडे मंदीचे सावट आहे, तर गेल्या काही महिन्यांपासून जनतेला महागाईच्या झळादेखील साेसाव्या लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजट काेलमडले आहे. मात्र, त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किराणा, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि कपड्यांच्या किंमती येणाऱ्या तिमाहीत घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एफएमसीजी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जीवनावश्यक तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील लागतमूल्य बरेच कमी झाले आहे. तसेच मागणीही व विक्रीही वाढली आहे. या क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास किंमतींमध्ये घट हाेण्याचे संकेत मिळतात. याचे प्रमुख कारण म्हणजे, उत्पादनांवरील लागत मूल्य घटण्याचे संकेत मिळत आहेत. साहजिकच वस्तुंच्या किंमती कमी हाेऊ शकतात. काही कंपन्या किंमत कमी करण्याऐवजी ऑफर्सही देऊ शकतात.
ऑक्टोबरमध्ये घटली महागाई
ऑक्टोबरमध्ये थोक व किरकोळ महागाईत घट नोंदविण्यात आली होती. त्यात प्रमुख कारण म्हणजे, खाद्यान्न तसेच खाद्यतेलांच्या किंमतीत झालेली घट, हे होते. बेराजगारीतही सुधारणा दिसून आली आहे. शहरी व ग्रामीण भागात रोजगार वाढले आहेत.
२०२३ मध्ये जग मंदीला सामाेरे जाणार
वाढलेल्या इंधनाच्या किमती, महागडी वीज, प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मरगळ आणि युक्रेन युद्धामुळे पुढील वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा सामना करावा लागू शकताे.
जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) ‘गुड्स बॅराेमीटर’ या संकेतकाच्या आधारे हा अंदाज वर्तविला आहे.
डब्ल्यूटीओचा अंदाज...
२०२३ मध्ये जागतिक व्यापारवाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्था सध्या अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये काेंडल्या गेली आहे.
डब्ल्यूटीओच्या माल व्यापार बॅराेमीटरचे आकडे हे संकेत देत आहेत. हा गुड्स ट्रेड बॅराेमीटर इंडेक्स सध्या ९६.२ अंकांवर आहे.
काय आहे गुड्स बॅराेमीटर?
जागतिक व्यापाराच्या दृष्टिकाेनातून गुड्स बॅराेमीटर एक प्रमुख संकेतक आहे. त्यातून व्यापाराबाबत वर्तमान परिस्थिती कळते.
रीडिंग्स काय सांगतात...
१०० हून अधिक असल्यास व्यापारात वृद्धी
१०० पेक्षा कमी असल्यास व्यापारात घट
जगभर निर्यातीवर हाेताेय परिणाम
जागतिक व्यापार संघटनेनुसार, अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये निर्यात ऑर्डर घटू लागल्या आहेत. त्यामुळे त्यात नकारात्मक रीडिंगची नाेंद झाली आहे. निर्यात ऑर्डर, हवाई मालवाहतूक आणि इलेक्ट्राॅनिक्स कंपाेनंट या क्षेत्रांच्या उपसंकेतकांमध्ये नकारात्मक नाेंदी आहेत.
क्षेत्र रीडिंग
निर्यात ऑर्डर ९१.७
हवाई मालवाहतूक ९३.३
इलेक्ट्राॅनिक कंपाेनंट्स ९१
कंटेनर शिपिंग ९९.३
कच्चा माल ९७.६
ऑटाेमाेटिव्ह क्षेत्र १०३.८
अमेरिकेसह युराेप, भारतात मजबूत वाहनविक्री झाली आहे. पुरवठा वाढल्यामुळे विक्रीतही वाढ झाली आहे. सेमिकंडक्टर चिपचा पुरवठादेखील सुरळीत हाेत आहे.