देशात महागाई आता डायन बनू लागली आहे. शेजारच्या श्रीलंका, पाकिस्तानपेक्षा थोडी बरी परिस्थिती असली तरी आता सामान्यांच्या खिशावर चांगलीच झळ बसू लागली आहे. केंद्र सरकारने मार्च महिन्यात विक्रमी कमाई केली आहे. असे असले तरी सामान्य नागरिक आता कंगाल होऊ लागला आहे.
मार्च महिन्यात 1.42 लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. एप्रिलमध्ये तर यापेक्षा जास्त जीएसटी गोळा होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकीकडे जीएसटी गोळा होत असताना सरकार या पैशातून सामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने गेल्या १० दिवसांत इंधनाचे दर 7.20 रुपयांनी वाढले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कंपन्यांनी निवडणुकीमुळे दर रोखले होते. परंतू त्यांना मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कंपनी भरून काढत आहेत.
देशातील अनेक शहरांत पेट्रोलचे दर ११५ ते १२० रुपये प्रति लीटर झाले आहेत. डिझेलनेही अनेक ठिकाणी शंभरी पार केली आहे. या किंमती आणखी वाढणार असल्याने पुढील काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्र सरकार एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. जीएसटीमध्ये वाढ झाल्याने सरकार हा पैसा इकडे वापरण्याची शक्यता आहे. तसेच अन्य काही वस्तूंवरील कर देखील कमी होण्याची शक्यता आहे.