नवी दिल्ली : जून २०२१ला संपलेल्या सहामाहीत देशातील दहा सर्वोच्च आयटी कंपन्यांनी १.२१ लाख कर्मचाऱ्यांची भरती केली असून, हा मागील पाच वर्षांतील उच्चांक ठरला आहे.
सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ साथ आयटी कंपन्यांसाठी वरदान ठरली आहे. साथीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील व्यवसाय-उद्योग डिजिटल होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सॉफ्टवेअर सेवाक्षेत्रातील मागणी अभूतपूर्व वाढली आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या महसुलातील वृद्धी यंदा दोन अंकी राहिली आहे.
सूत्रांनी सांगितले की, दहा कंपन्यांतील मागील पाच वर्षांतील सर्वाधिक भरती २०१९ मध्ये झाली होती. तेव्हा पहिल्या सहामाहीत या कंपन्यांनी ४५,६४९ कर्मचारी भरले होते. यंदाच्या संपूर्ण वर्षातील भरतीचा आकडा दोन लाखांच्या वर जाईल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, आयटी क्षेत्र हे देशातील सर्वाधिक नोकऱ्या देणारे क्षेत्र आहे. ४.५ दशलक्ष लोकांना यातून रोजगार मिळतो. जीडीपीतील आयटी क्षेत्राचा वाटा ८ टक्के आहे. १९९२-९३ मध्ये तो अवघा ०.४ टक्के होता. आयटी क्षेत्राचा आकार १९९१ मध्ये १५० दशलक्ष डॉलरचा होता. देशातील ९ शहरांतील १,२०० व्यवसायांना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले.
पहिल्या तिमाहीत देशातील रोजगारामध्ये झाली ११ टक्के वाढ
कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले स्थानिक निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल झाल्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील नोकरभरतीत ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ६१ टक्के रोजगार माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधील आहेत. ‘व्हॅल्यूव्हॉक्स’ने ‘इंडिड इंडिया’ या संस्थेसाठी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
‘इंडिड इंडिया हायरिंग ट्रॅकर’ या नावाने एक सर्वेक्षण अहवाल दोन्ही संस्थांनी जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, जून २०२१ ला संपलेल्या तिमाहीत भारतातील नोकरभरती ११ टक्क्यांनी वाढली आहे. ६१ टक्के वृद्धीसह माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र नोकरभरतीत अव्वल स्थानी राहिले. वित्तीय सेवा क्षेत्रात ४८ टक्के, तर बीपीओ आयटीईएस क्षेत्रात ४७ टक्के वाढ दिसून आली.