Join us  

यंदाही होणार विक्रमी अन्नधान्य उत्पादन; ३.७४ टक्क्यांची वाढ अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 7:26 AM

foodgrain production : पिकांचे वर्ष २०२०-२१(जुलै ते जून) साठीच्या चौथ्या तिमाहीचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : गतवर्षामध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे देशातील अन्नधान्याचे उत्पादन चांगले आले आहे. गहू, तांदूळ तसेच कडधान्याच्या मोठ्या प्रमाणातील पिकांमुळे उत्पादनात ३.७४ टक्क्यांनी वाढ होऊन ते ३० कोटी ८६ लाख ५० हजार टनावर पोहोचण्याचा अंदाज आहे. आतापर्यंतचा हा विक्रम आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. यावर्षी गहू, तांदूळ, मका, डाळी तसेच तिळाचे उत्पादन हे नवीन विक्रम करणारे आहे. पिकांचे वर्ष २०२०-२१(जुलै ते जून) साठीच्या चौथ्या तिमाहीचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. तिसऱ्या तिमाहीनंतर देशामध्ये ३० कोटी ५४ लाख ३० हजार टन अन्नधान्याचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. त्यामध्ये चौथ्या तिमाहीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षाचा विचार करता अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये ३.७४ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. सन २०१९-२०मध्ये देशामध्ये २९.७५ कोटी टनाचे अन्नधान्य उत्पादन झाले होते. 

असे असेल पिकांचे उत्पादनयंदा देशामध्ये तांदळाचे उत्पादन १२ कोटी २२ लाख ७० हजार टन होण्याची अपेक्षा असून, हा एक विक्रम असेल. गव्हाच्या उत्पादनामध्येही वाढ होणार असून, ते १० कोटी ९५ लाख १० हजार टनावर पोहोचू शकेल. इतर धान्यांचे उत्पादन ५ कोटी ११ लाख टनावर जाऊ शकते.  डाळींच्या उत्पादनामध्येही विक्रमी वाढ होऊन ते २ कोटी ५७ लाख टनावर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागीलवर्षी उसाचे उत्पादन ३७ कोटी ५ लाख टन होते, ते यंदा ३९ कोटी ९२ लाख ५० हजार टनावर जाण्याचा अंदाज आहे. तीळ, मोहरी यांच्या उत्पादनामध्येही चांगली वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.कापसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. ३ कोटी ६० लाख गाठींच्या उत्पादनाचा आधीचा अंदाज आता कमी झाला असून, यंदा ३ कोटी ५३ लाख ८० हजार गाठींचेच उत्पादन होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :व्यवसाय