Join us

शेअर बाजारात विक्रम, IPO मार्केटमध्ये तेजी; तुमच्यासाठी येतेय ७,००० कोटी रुपयांची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:38 AM

गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात तेजीचं सत्र सुरू आहे.

सध्या शेअर बाजारात तेजी आहे. बुधवारी प्रथमच निफ्टी50 निर्देशांक 20,000 च्या वर बंद झाला. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना आयपीओ मार्केटमध्ये पैसे कमवण्याची चांगली संधी आहे. 7,000 कोटींहून अधिक किमतीचे IPO येत्या काही दिवसांत बाजारात दाखल होणार आहेत. या आठवड्यात 4,673 कोटी रुपयांचे IPO खुले होत आहेत तर 3,000 कोटी रुपयांचे इश्यू पुढील आठवड्यात बाजारात येतील. झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस आणि समही हॉटेसचे इश्यू आज खुले झाले असून आरआर केबलचा आयपीओ बुधवारी खुला झाला. त्याचप्रमाणे कोडी टेक्नोलॅब आणि यात्रा ऑनलाइनचे आयपीओही या आठवड्यात येणार आहेत.

पुढील आठवड्यात सिग्नेचर ग्लोबल, अपडेटर सर्व्हिसेस, साई सिल्क आणि वैभव ज्वेलर्सचे आयपीओ बाजारात येतील. शेअर बाजारातील तेजीमुळे कंपन्यांचा आत्मविश्वास वाढला असून कंपन्या आयपीओ आणत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बुधवारी निफ्टी 20,070 अंकांवर बंद झाला. प्रथमच तो 20,000 च्या वर बंद झाला आहे. सेन्सेक्स सलग नवव्या दिवशीही तेजीसह बंद झाला. गेल्या नऊ दिवसांत दोन्ही निर्देशांकात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

किती आहे साईजआरआर केबलच्या आयपीओची साईज 1964 कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे सामही हॉटेलचा इश्यू 1,370 कोटी रुपये, साई सिल्कचा 1,200 कोटी रुपये, यात्रा ऑनलाइनचा 772 कोटी रुपये, सिग्नेचर ग्लोबलचा 730 कोटी रुपये, झॅगल प्रीपेड ओशनचा 563 कोटी रुपये आणि वैभव ज्वेलर्सचा आयपीओ 300 कोटी रुपयांचा आहे. आयपीओ बाजारातील घसरणीमागे तांत्रिक कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या महिन्यात आयपीओ लाँच करण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांना त्यांच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये एप्रिल-जून तिमाहीचे आकडे अपडेट करावे लागतील.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारसेबी