लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. पोषक वातावरण असल्याने या व्यवस्थेचे जागतिकीकरणही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे यूपीआय व्यवहारांची संख्या दर महिन्यात नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. २०२३ च्या एकट्या ऑक्टोबर महिन्यात देशात यूपीआयद्वारे एकूण १७.१६ लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. महिनाभरात एकूण १,१४१ कोटी व्यवहार यूपीआयने करण्यात आले आहेत.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये १,०५६ कोटींहून अधिक व्यवहार झाले. सलग तिसऱ्या महिन्यात देशातील यूपीआय व्यवहारांची संख्या १००० हून अधिक झाल्याचे दिसून येत आहे.
वाढीमागे नेमकी कारणे काय?
- दुकानदार आणि ग्राहकांमध्ये होणाऱ्या यूपीआय व्यवहारांमधील वाढ सर्वाधिक आहे.
- यूपीआयआधारित थर्ड पार्टी पेमेंट ॲप्सद्वारे या सुविधेचा होणारा वापर वाढल्याने एकूण व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
पाच वर्षांत प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत
- येत्या दोन ते तीन वर्षांत यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या दर महिन्याला ३० अब्जांच्या घरात पोहोचावी, असे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. म्हणजेच दररोज एक अब्ज व्यवहार यूपीआयद्वारे होतील.
- पीडब्यूसी इंडियाच्या अहवालानुसार २०२७ पर्यंत एकूण यूपीआय व्यवहार दरदिवशी १०० कोटींपर्यंत पोहोचतील. पाच वर्षांत एकूण व्यवहारांमध्ये ९० टक्के यूपीआयद्वारे झालेले असतील. व्यवहारांमध्ये यूपीआयचाच दबदबा असेल.
१० वर्षांत सातत्याने वाढ
- काही वर्षांपूर्वीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येईल की, २०१३ च्या आर्थिक वर्षात यूपीआयद्वारे १३९ लाख कोटी रुपयांच्या मूल्याचे एकूण ८,३७६ व्यवहार झाले होते.
- २०१२ या आर्थिक वर्षात ८४ लाख कोटी रुपये मूल्याचे एकूण ४,५९७ व्यवहार यूपीआयद्वारे कऱण्यात आले होते.
तीन महिन्यांतील व्यवहार
महिना व्यवहार मूल्य(कोटींमध्ये)
- ऑक्टोबर १,१४१ १७.१६ लाख कोटी
- सप्टेंबर १,०५६ १५.८० लाख कोटी
- ऑगस्ट १,०५८ १५.७६ लाख कोटी