Join us  

जून तिमाहीत विक्रमी नफा, शेअरही वाढला; आता पायलट, क्रू मेंबर्सना वेतनं वाढीचं IndiGoचं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 5:00 PM

तिमाही निकालानंतर, कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी दिसून येत आहे.

इंटरग्लोब एव्हिएशनने जून तिमाहीत विक्रमी निव्वळ नफा मिळवल्यानंतर त्यांच्या मालकीच्या इंडिगो एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, तिमाही निकालानंतर, कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी दिसत असून आणि त्याची किंमत आजवरच्या उच्चांकी पातळीच्या जवळ पोहोचलीये.

2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 3,090 कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा नोंदवल्यानंतर भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोनं आपल्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या पगारात वाढ करणार असल्याची माहिती दिली. एअरलाइन्सनं सुमारे 4,500 फ्लाइट क्रूच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरूवात केली असून वाढीसह नवीन वेतन 1 ऑक्टोबरपासून लागू केलं जाणार असल्याचंही म्हटलंय.

भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेत इंडिगोचा हिस्सा 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कंपनीनं एप्रिल ते जून या कालावधीत 3,090 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो आतापर्यंतच्या तिमाहितील सर्वाधिक नफा आहे. विक्रमी नफ्यानंतर, कंपनीनं कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ देण्यासाठी आपल्या योजनेचा एक भाग म्हणून पगारवाढीची घोषणा केली आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत नफा नोंदवल्यानंतर, कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 3 टक्के बोनस जाहीर केला होता.

शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीडजून तिमाहीचे जबरदस्त निकाल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या घोषणेचा सकारात्मक परिणाम इंडिगोच्या शेअर्समध्ये तेजीच्या रुपानं दिसून आला. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, इंडिगोच्या शेअरमध्ये 57.25 रुपये किंवा 2.34 टक्क्यांची वाढ होऊव तो 2,505 रुपयांवर पोहोचला. ही किंमत 2,745 रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीच्या जवळ पोहोचली आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इंडिगोशेअर बाजार