मुंबई : आयात-निर्यातीचे गणित बिघडल्याने देशाची व्यापार तूट तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. निर्यातीच्या दुप्पट आयात झाल्याचा हा परिणाम आहे. ही तूट विक्रमी उच्चांकावर जात आहे.देशाची अर्थव्यवस्था जलदगतीने विकासाकडे जात असल्याचे आंतरराष्टÑीय अहवाल सांगत असले तरी देशांतर्गत व्यापाराची स्थिती भीषण झाली आहे. अर्थसंकल्प जेमतेम १५ दिवसांवर आला असताना डिसेंबर महिन्यातील व्यापारी तूट १४.८८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. याआधी नोव्हेंबर २०१४ मध्ये ही तूट विक्रमी १६.२ अब्ज डॉलरवर होती, तर डिसेंबर २०१६ मध्ये ही तूट ११.५ अब्ज डॉलरवर होती.व्यापारी तूट किंवा व्यापारातील शिलकी ही आयात-निर्यातीच्या गणितावर अवलंबून असते. आयात अधिक असल्यास तूट निर्माण होते. डिसेंबर महिन्यातील निर्यात नोव्हेंबरपेक्षा १२.३ टक्क्यांनी वाढून ती २७ अब्ज डॉलरवर गेली. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दरांचा डिसेंबर महिन्यातील आयातीवर परिणाम झाला.यासोबतच सोन्याची आयातही वाढली आहे. या दोन्हींचा परिणाम होऊन डिसेंबर महिन्यातील आयात ही २१.१ टक्क्यांनी वधारून ४१.१ अब्ज डॉलरवर गेली. त्यातूनच मोठी व्यापार तूट निर्माण झाली आहे, असे आकडेवारीवरून दिसते.रिअल इस्टेटसह अन्य स्थावर गुंतवणुकीचे देशांतर्गत पर्याय सध्या कमकुवत झाले आहेत. त्या क्षेत्रांमधून परतावा कमी येत आहे. यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतली आहे. डिसेंबर महिन्यातील सोन्याची आयात तब्बल ७१.५२ टक्के वाढून ती ३.३९ अब्ज डॉलर झाली, तर चांदीच्या आयातीतही १०६ टक्क्यांची वाढ झाली. हीच आयात व्यापारी तुटीस कारणीभूत ठरली आहे. दरम्यान, अशीच स्थिती २०१३ मध्येही होती. त्यावेळी अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याचा आरोप सध्या सत्तेत असलेल्या तत्कालीन विरोधी पक्षांकडून केला जात होता, हे विशेष.
देशाची व्यापार तूट विक्रमाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:51 AM