लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पेट्रोलच्या निर्यातीवर लावण्यात आलेला कर रद्द करतानाच डिझेल व विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवर लावण्यात आलेला अतिरिक्त लाभ कर (विंडफॉल टॅक्स) कमी करण्याची घोषणा केंद्र सरकारने बुधवारी केली. याशिवाय देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील करातही दिलासा देण्यात आला आहे.
पेट्रोलच्या निर्यातीवरील प्रतिलिटर ६ रुपयांचा निर्यात कर रद्द करण्यात आला आहे. डिझेल व एटीएफच्या निर्यातीवरील कर प्रत्येकी २ रुपयांनी कमी करून अनुक्रमे ११ रुपये आणि ४ रुपये करण्यात आला आहे. देशांतर्गत उत्पादित करण्यात आलेल्या कच्च्या तेलावरील प्रतिटन २३,२५० रुपयांचा कर कमी करून १७,००० रुपये करण्यात आला आहे. याचा ओएनजीसी आणि वेदांता लिमिटेड यांसारख्या कंपन्यांना फायदा होईल.
सरकारने रिफायनरींना निर्यात करापासून दिलासा दिला आहे. तेलाचे दर घसरल्यामुळे तेल उत्पादक आणि रिफायनरी कंपन्यांच्या नफ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. जागतिक मंदीच्या भीतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत.