मुंबई : हजार-पाचशेच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर अब्जावधी रुपये बँकांत जमा झाल्यामुळे बँकांकडील ठेवींत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून व्याज दरांत कपात होण्याची शक्यता आहे. रोख रकमेची उपलब्ध घटल्यामुळे नागरिकांकडून खर्चात कपात होणार आहे. त्यामुळे आर्थिक वृद्धीचा दर घसरण्याची शक्यता आहे.
अब्जावधींच्या नोटांचा भरणा झाल्यामुळे बँकांकडील भांडवल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा पैसा बँकांना वापरावा लागेल. सरकारी रोखे खरेदी करणे, तसेच कर्ज देण्याचे प्रमाण वाढविणे, अशा दोन प्रकारांनी बँका हा पैसा वापरू शकतात. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रोखे बाजाराचा निर्देशांक १५ आधार अंकांनी वाढला. दशवार्षिक गिल्ट ६.७२ टक्क्यांवरून ६.६५ टक्क्यांवर गेला. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे सहसंचालक सौम्यजित नियोगी यांनी सांगितले की, बँकांकडे पैसा आल्यामुळे सरकारी रोख्यांची मागणी वाढेल. व्यवस्थेतील तरलतेची गळती कमी झाल्यामुळे ओएमओ खरेदीला मात्र काहीच वाव राहणार नाही.
बर्कलेज बँकचे मुख्य अर्थतज्ज्ञ सिद्धार्थ संन्याल यांनी सांगितले की, नोटा बंदीमुळे बँकांकडील पैसा वाढला. त्याच प्रमाणे अर्थव्यवस्थेतील पैसा कमी झाला. त्यामुळे महागाई घटेल. समांतर अर्थव्यवस्था ठप्प होईल. त्यामुळे बाजारातील मागणी घटेल. अंतिमत: अर्थव्यवस्थेचा
वृद्धी दरही घटेल. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या जानेवारी-मार्च तिमाहीत रिझर्व्ह बँक धोरणात्मक व्याज दरांत २५ आधार अंकांची कपात करू शकते. (प्रतिनिधी)
बँकांत पैसे आल्याने व्याजदरांत होणार कपात
हजार-पाचशेच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर अब्जावधी रुपये बँकांत जमा झाल्यामुळे बँकांकडील ठेवींत मोठी वाढ झाली आहे.
By admin | Published: November 15, 2016 01:47 AM2016-11-15T01:47:24+5:302016-11-15T01:47:24+5:30