नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत घसरण सुरूच असल्यामुळे गुरुवारी भारतातील पेट्रोल व डिझेलच्या दरांत मोठी कपात करण्यात आली. पेट्रोलच्या दरात २४ पैसे, तर डिझेलच्या दरात २२ पैसे कपात करण्यात आली. १२ जानेवारीपासून दोन्ही इंधनांचे दर घसरत आहेत. काल त्यात बदल झाला नव्हता. आजच्या कपातीनंतर राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे दर आता प्रतिलीटर ७३.३६ रुपये आणि डिझेलचे दर ६६.३६ रुपये झाले.
मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर ७८.९७ रुपये, तर डिझेल ६९.५६ रुपये झाले. बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलीटर ७५.८१ रुपये आणि डिझेलचा दर ६८.५७ रुपये झाला. चेन्नईत पेट्रोल ७६.१९ रुपये, तर डिझेल ७०.०९ रुपये लीटर झाले. हैदराबादेत पेट्रोल ७८.०१ रुपये, तर डिझेल ७२.३६ रुपये लीटर झाले. गुरगावमध्ये पेट्रोलचा दर ७३.१६ रुपये, तर डिझेलचा दर ६५.५८ रुपये लीटर राहिला.
सूत्रांनी सांगितले की, १२ जानेवारीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी २.५ रुपयांपेक्षा जास्त घसरले आहेत. कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल यांना जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.
जीएसटीने दिलासा
काँग्रेस नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये आणल्यास दर कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे चव्हाण यांनी सांगितले.
कच्चे तेल उतरल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरांत कपात
मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर ७८.९७ रुपये, तर डिझेल ६९.५६ रुपये झाले.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 12:27 AM2020-01-31T00:27:41+5:302020-01-31T00:27:53+5:30