नवी दिल्ली : पब्लिक लिमिटेड कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’ला खासगी कंपनीत (प्रायव्हेट लिमिटेड) रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवादाने नकार दिला आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत सायरस मिस्त्री यांच्यावर त्यांच्या मालकीची हिस्सेदारी विकण्याची जबरदस्ती टाटा सन्सने करू नये, असेही लवादाने म्हटले आहे.सायरस मिस्त्री यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर लवादाचे अध्यक्ष न्या. एस. जे. मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय पीठाने हा निर्णय दिला. लवादाने म्हटले की, खासगी कंपनीत रूपांतर करण्याबाबत आपण नंतर निर्णय देऊ. टाटा सन्ससह अन्य प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश लवादाने दिले असून, १0 दिवसांत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून आपली हकालपट्टी करण्याच्या निर्णयास मिस्त्री यांच्या वतीने लवादात आव्हान देण्यात आले होते. पण लवादाने ही याचिका फेटाळली होती. त्यामुळे मिस्त्री यांनी लवादाकडे अपील दाखल केले होते. १४ आॅगस्टला अपील लवादाने त्यावरील निर्णय राखून ठेवला होता....तर विकणे अशक्यगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये टाटा सन्सचे खासगी कंपनीत रूपांतर करण्यास समभागधारकांनी मंजुरी दिली होती. असे झाल्यास मिस्त्री कुटुंबीयांना त्यांचे समभाग बाहेरच्यांना विकता येणार नाहीत.पब्लिक लिमिटेड कंपनीचे भागधारक आपले समभाग कोणालाही विकू शकतात.
‘टाटा सन्स’चे खासगीकरण थांबवण्यास लवादाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 4:59 AM