शार्क टँक इंडियाचे ३ (Shark Tank India) सीझन आले असून आता चौथा सीझन (Shark Tank India 4) लवकरच येणार आहे. शार्क टँक इंडियानं यासंदर्भात एक प्रोमो जारी केला आहे. प्रोमोमध्ये सांगण्यात आले आहे की, चौथ्या सीझनसाठी स्टार्टअपची नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी स्टार्टअपची नोंदणी करायची असेल तर काय करावं लागेल, हेही सांगण्यात आलं आहे.
शार्क टँक इंडियाच्या प्रोमोनुसार, जर तुम्हालाही या शोसाठी आपला स्टार्टअप रजिस्टर करायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या ऑफिशियल लिंकवर (sharktank.sonyliv.com) जावं लागेल. तिथे तुम्हाला स्वतःची आणि तुमच्या बिझनेसची सगळी माहिती भरावी लागेल. कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या, सर्व माहिती काळजीपूर्वक भरा, असं त्यांनी म्हटलं.
दुसराही प्रोमो केला रिलीज
सोनी लिव्ह इंडियानं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर जारी केलेल्या आणखी एका प्रोमोमध्ये एक बिझनेस माईंडेड व्यक्ती ९ ते ५ च्या नोकरीत अडकलेली दिसत आहे. नंतर त्या व्यक्तीच्या लक्षात येतं की तो नोकरीसाठी नाही, तर बिझनेससाठी बनलेला आहे. याच कथेसह शार्क टँक इंडियाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. 'सिर्फ जॉब नहीं, अपने ड्रीम आइडिया के पीछे भागेगा इंडिया' अशी या शो ची टॅगलाईन आहे.
कसं कराल रजिस्टर?
शार्क टँक इंडियासाठी आपल्या स्टार्टअपची नोंदणी करायची असेल तर आधी तुम्हाला sharktank.sonyliv.com जावं लागेल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, तो एन्टर करून आलेला ओटीपी टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची आवडती भाषा निवडावी लागेल. एकूण १२ पानांमध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल. हे सर्व केल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.