लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अदानी समूहाच्या समभागांच्या भाववाढीतील कथित हेराफेरीत सेबीच्या अपयशाचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. अदानी समूहाच्या समभागांतील तेजीमागे नियामकीय अपयश होते, असा निष्कर्ष काढता येऊ शकत नाही, असे समितीने म्हटले आहे. अदानी समूहास मिळालेल्या विदेशी संस्थांच्या निधीचा सेबीचा तपास कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचलेला नाही, असेही समितीने नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.एम. सप्रे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत ओ.पी. भट्ट, के.व्ही. कामत, नंदन निलेकणी आणि सोमशेखर सुंदरेशन यांचा समावेश होता.
अमेरिकी शॉर्टसेलर संस्था 'हिंडेनबर्ग रिसर्च' ने अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कृत्रिम फुगवटा आणि तेजी आणल्याचा तसेच खात्यांमध्ये फेरफार केल्याचा दावा एका अहवालातून केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने २ मार्च रोजी तज्ज्ञांची एक समिती नेमली होती. समितीने ६ मे रोजी अहवाल न्यायालयास सादर केला. तो शुक्रवारी सार्वजनिक करण्यात आला.
अहवालात काय म्हटले?
- हिडेनबर्ग रिसर्चच्या आधी अदानी समूहात 'शॉर्ट पोझिशन'चा (भाव पाडून नफा कमावणे) एक पुरावा होता. हिडेनबर्ग अहवालानंतर भाव पडल्यानंतर या सौद्यांत नफाही कमावला आहे.
- अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या १३ विदेशी संस्थांशी प्रवर्तकांचे संबंध असावेत, असा सेबीला संशय आहे.
- अदानी समूहात वॉश ट्रेडचा (व्यवहारवाढीसाठी स्वतःच समभाग खरेदी करणे व विकणे) कोणताही पॅटर्न आढळला नाही. काही संस्थांनी हिडेनबर्ग अहवाल येण्याआधीच शॉर्ट पोझिशन घेतली होती. भाव पडल्यानंतर खरेदी करून त्यांनी नफा कमावला.
अहवालातील ठळक निष्कर्ष
- हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीतील छोट्या गुंतवणूकदारांचा हिस्सा उलट वाढला आहे.
- हिंडेनबर्ग अहवालानंतर काही कंपन्यांनी समभाग विक्रीतून अल्पावधीत कमावलेल्या नफ्याची चौकशी होणे आवश्यक आहे.
- संबंधित प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे सोपविण्याबाबत सेबीने कोणतेही मुख्य आरोप केले नसल्याचे आढळून आले आहे.
- भांडवली बाजारात अस्वस्थता निर्माण न होऊ देता अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग आता नव्या मूल्यावर स्थिरावले आहेत.
- गुंतवणूकदारांना दिलासा देण्यास अदानी समूहाने केलेल्या उपाययोजना प्रशंसनीय आहेत.
- सेबीच्या विद्यमान चौकशीमुळे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.
- सेबीने १३ विदेशी संस्था आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची चौकशी केली. त्यातून ४२ गुंतवणूकदारांची माहिती समोर आली. त्यांच्या तपासाची जबाबदारी सेबीवर सोपविली आहे.
- अदानी समूहाने सर्व लाभकारक भागीदारांची माहिती जाहीर केलेली आहे.
- अदानी समूह लाभार्थ्यांची नावे जाहीर करत नसल्याचा ठपका सेबीने ठेवलेला नाही.