नवी दिल्ली : २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सहभागी स्वान टेलिकॉम प्रायव्हेट लिमिटेडला(एसटीपीएल) रिलायन्स एडीए समूहाने नियम धाब्यावर बसवत सर्व निधी पुरविल्याचा दावा सीबीआयने शुक्रवारी विशेष न्यायालयात केला. स्वान टेलिकॉमने देशभरातील १४ दूरसंचार सर्कलसाठी परवाना मिळविल्यानंतर एडीए समूहाने पैसा वळता करण्याचा मार्ग अवलंबला. परवाने आणि महागड्या रेडिओ लहरी मिळविण्यासाठी रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडने (आरटीएल) स्वान टेलिकॉम या अपात्र कंपनीचा अग्रणी कंपनी म्हणून वापर केल्याचा आरोपही सीबीआयने आरोपपत्रात केलाआहे. स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद उस्मान बलवा, विनोद गोयंका तसेच रिलायन्स एडीएजीचे गौतम दोशी, सुरेंद्र पिपारा आणि हरी नायर या तीन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माजी दूरसंचार मंत्री ए. राजा, द्रमुकच्या खासदार कनीमोझी यांच्या नावाचाही आरोपपत्रात समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
स्वान टेलिकॉमला सर्व पैसा रिलायन्स एडीएजीचा
By admin | Published: October 30, 2015 9:35 PM