देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहानं सर्वांना मागे टाकलं आहे. जगातील मोस्ट इनोव्हेटिव्ह 50 कंपन्यांच्या यादीत टाटा समूहानं 20 वा क्रमांक मिळवलाय. या यादीत अन्य कोणत्याही भारतीय कंपनीला स्थान मिळालेलं नाही. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपची मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपनीज 2023 ही यादी बुधवारी प्रसिद्ध झाली. या यादीत कंपन्यांना त्यांची कामगिरी, धक्के सहन करण्याची क्षमता आणि इनोव्हेशन या बाबींच्या आधारे स्थान देण्यात आलं आहे.
टाटा समूहाने 2045 पर्यंत नेट झिरो एमिशनचे लक्ष्य ठेवलं आहे. या यादीत आयफोनचं उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी ॲपल पहिल्या क्रमांकावर आहे, तर इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेस्लाच्या यापूर्वीच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे.
अमेरिकेतील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन या कंपन्यांच्या क्रमवारीच तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट चौथ्या तर मायक्रोसॉफ्ट पाचव्या क्रमांकावर आहे. यानंतर अमेरिकेची फार्मा कंपनी मॉडर्ना, दक्षिण कोरियाची सॅमसंग (Samsung), चीनची हुवावे (Huawei) आणि बीवायडी कंपनी (BYD Company) याशिवाय सीमेन्स (Siemens) यांना स्थान देण्यात आलंय. पहिल्या 10 कंपन्यांमध्ये सहा अमेरिकन आणि 2 चिनी कंपन्यांचा समावेश आहे. Pfizer ला या यादीत 11 वे स्थान मिळाले आहे तर स्पेस एक्स 12 व्या स्थानावर आहे. मार्क झुकरबर्गची कंपनी मेटाच्या (फेसबुक) स्थानात पाच स्थानांनी घसरण झाली असून ती 16 व्या क्रमांकावर आली आहे.