Reliance AGM 2023: देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी एजीएम आज पार पडली. देशात हजारो कंपन्या असल्या तरी सर्वात जास्त चर्चा आहे ती रिलायन्सच्या एजीएमची होती. याचं कारण म्हणजे कंपनीच्या गुंतवणूकदारांची संख्या ३६ लाखांहून अधिक आहे. या कारणास्तव, त्याची देशभरात सर्वाधिक चर्चा आहे. एजीएमदरम्यान रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी चंद्रयान ३ चा उल्लेख करत त्याच्या यशाचं कौतुकही केलं. नव्या भारतात मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास आहे. भारत ना कधी थांबतो, ना कधी कधी, ना कधी हरतो, असं अंबानी शेअरधारकांना संबोधित करताना म्हणाले. नीता अंबानी यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिला. परंतु त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन म्हणून कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
आमच्यासाठी आमच्या शेअरधारकांचं हित महत्त्वाचं आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित देश बनवण्याचं लक्ष्य आहे. गेल्या १० वर्षांमध्ये १५ हजार कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. आम्ही अशक्य वाटणारं प्रत्येक ध्येय गाठल्याचं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या संचालक मंडळात बदलांची घोषणा केली. आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांना संचालक मंडळात सहभागी करण्यात आलं. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या खांद्यावर नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, नीता अंबानी यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिला. परंतु त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन म्हणून कायम राहणार आहेत.
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रिलायन्सनं २.६ लाख नोकऱ्या दिल्याचं अंबानी आपल्या शेअरधारकांना संबोधित करताना म्हणाले. रिलायन्स जिओचा प्रति महिना खर्च होणारा डेटा ११०० कोटी जीबी आहे. महिन्याला प्रत्येक युझर सरासरी २५ जीबी डेटाचा वापर करत आहे. प्रति महिना ट्रॅफिक ४५ टक्क्यांनी वाढला आहे. केवळ ९ महिन्यांत ९६ टक्के शहरांमध्ये रिलायन्स जिओचं ५जी कव्हरेज आल्याचं अंबानी यावेळी म्हणाले. रिलायन्स जिओनं ४५ कोटी सबस्क्रायबर्सचं लक्ष्य पार केल्याचंही त्यांनी सांगितलं.
महसूल ९.७४ लाख कोटींवर
रिलायन्सचा महसूल ९.७४ लाख कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा ७३,०० कोटी आहे. रिलायन्सची निर्यात ३.४ लाख कोटी रुपयांची आहे आणि रिलायन्सनं १,७७,१७३ कोटी रुपयांचे टॅक्सच्या रुपात योगदान दिलंय. आमच्या ऑन-रोल कर्मचाऱ्यांची संख्या ३.९लाख असल्याची माहितीही मुकेश अंबानी यांनी दिली.